लोकसत्ता वार्ताहर
पंढरपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्वांचीच इच्छा असून, यासाठी विठ्ठलाला साकडे घातल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी येथे सांगितले.
ठाकरे गटाच्या विधानसभानिहाय बैठकीसाठी दानवे आले होते. बैठकीआधी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शुक्रवारी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाने मौन धारण केल्याने आघाडीत हा मुद्दा सध्या तणावाचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे.
आणखी वाचा-सांगली, मिरजेसह जिल्ह्यात बाह्य रुग्ण सेवा बंद
दानवे म्हणाले, की महाविकास आघाडीमध्ये राज्याला चांगले नेतृत्व देण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यात आहे. सर्वसामान्य कल्याणकारी सुराज्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली येऊ शकते. त्यामुळे पुन्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ दे, असे साकडे विठ्ठलाला घातल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामांचा पैसा हा लोकप्रिय योजनेकडे वळविला असल्याचे सांगत ‘लाडकी बहीण’ योजनेवर दानवे यांनी टीका केली
© The Indian Express (P) Ltd