केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकारपरिषद घेत राज्यात विविध मुद्य्यांवरून मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आणि भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
नारायण राणे म्हणाले, “सत्तेवरून गेल्यावर सध्या अनेकजण सध्या सीमाभागाबद्दल बोलत आहेत. बाळासाहेब ठाकरे असतानाच सुरुवातीला बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र व्हावं म्हणून एक आंदोलन झालं. लाठीचार्ज झाला, अनेकांचे बळीही गेले. तेव्हा उद्धव ठाकरे नव्हते. आदित्य ठाकरे तर नव्हतेच. आंदोलनं आणि उद्धव ठाकरेंचा काहीच संबंध नाही. कधी आले, पाहीलं, सहभाग घेतला असं नाही. शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात काही योगदान नाही. मराठी माणसावर जर कुठे अन्याय होतोय, दंगल होतोय, मराठी माणूस मार खातोय तर तिथे हे कधीच आयुष्यात गेले नाहीत म्हणून मग त्यांनी याबद्दल बोलूच नये.”
याचबरोबर “सावरकारांबद्दल आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले परखड विचार मांडले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आम्ही दैवत मानतो. मग त्यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांना जो आदर होता, सावकरांबद्दल सन्मान होता तो उद्धव ठाकरेंना आहे का? ते काहीतरी बोलले का? सावरकरांबद्दल ज्यांनी उच्चार काढले ते राहुल गांधी महाराष्ट्रात आले आणि आदित्य ठाकरेंना मिठी मारून परत गेले.” असंही नारायण राणेंनी म्हटलं.
याशिवाय “मग यांची सावरकरांबद्दल काय, हिंदुत्वाबद्दल भूमिका काय? जे उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जवळ गेले, मुख्यमंत्री झाले त्यांनी हिंदू हा शब्द उच्चारू नये. हिंदुत्वाशी गद्दारी केली असं मी म्हणेन. म्हणून सावरकरांची माफी कितीवेळा जरी मागितली तरी ते आता काही भरून येणार नाही.” असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.