महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर त्याचे राज्यात पडसाद उमटू लागले आहेत. दोन्ही बाजूंनी निकालाबाबत दावे केले जात आहेत. यासंदर्भात इतर मुद्द्यांप्रमाणेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतलेले निर्णय बेकायदेशीर ठरवण्याच्या न्यायालयाच्या निकालाची जोरदार चर्चा चालू आहे. यासंदर्भात भगतसिंह कोश्यारींनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरून आता खुद्द ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी?

उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी पाचारण करण्याचा राज्यपालांचा निर्णय चुकीचा होता, असं न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांनी दिल्लीत त्यांची प्रतिक्रिया घेतली. तेव्हा बोलताना त्यांनी तेव्हा योग्य वाटला तो निर्णय मी घेतला असं म्हटलं.

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ठाकरे गटाचा प्लॅन ऑफ अॅक्शन तयार; म्हणाले, “१५ दिवसांत…!”

“तीन महिन्यांपूर्वीच राज्यपाल पदावरून मी दूर झालो आहे. मी राजकीय मुद्द्यांपासून स्वत:ला वेगळं ठेवलं आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होतं. त्यावर न्यायालयानं निकाल दिला आहे. या निकालावर जे कायद्याचे जाणकार आहेत, तेच प्रतिक्रिया देतील.मी कायद्याचा विद्यार्थी नाहीये. मला संसदीय कामकाज माहिती आहे. त्यावेळी मी जे पाऊल उचललं, ते विचारपूर्वक उचललं. एखाद्याचा राजीनामा माझ्याकडे आला तर मी काय त्याला असं सांगणार का की राजीनामा नका देऊ? सर्वोच्च न्यायालयाने जर काही म्हटलं असेल, तर त्याचं विश्लेषण करणं विश्लेषकांचं काम आहे, माझं काम नाही”, असं कोश्यारी म्हणाले.

“राज्यपाल कसंही वागू शकतात असं नाही”

दरम्यान, यासंदर्भात आज उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यांनी त्यावर परखड भाष्य केलं. “मग जर कुणी म्हटलं की त्या वेळी मला वाटलं की एखाद्याची हत्या करावी तर नंतर तुम्ही ते योग्य मानाल का? हत्या ती हत्याच असते. त्यात तेव्हा आणि आत्ताचा काही प्रश्न नसतो. त्यांनी बेकायदेशीर कृत्य केलं आहे. त्यासाठी मला तर वाटतं की त्यांच्यावर एक खटला चालायलाच हवा. राज्यपाल महोदय कोणत्या कायद्याच्या कारवाईत येत नाहीत याचा अर्थ असा नाही ते त्यांना हवं तसं वागू शकतील. हे काही चित्रपटाचं गाणं नाहीये. हे बेकायदेशीर सरकार स्थापन करून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूर केली आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Maharashtra Satta Sangharsh: नऊ मुद्द्यांच्या आधारे जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल!

“त्यांच्यावर फसवणुकीचाच दावा ठोकला पाहिजे”

“कोश्यारींवर फसवणुकीचाच दावा ठोकला गेला पाहिजे. मग ते ४२० असेल किंवा काय असेल ते बघा. पण ही अशी माणसं राज्यपाल पदाची अवहेलना करत आहेत. त्यामुळे एकाला शिक्षा झाली तर उद्या असं कुणी करण्याचं धाडस करणार नाही. जेव्हा पदाची शपथ तुम्ही घेता तेव्हा ती घटनेवर हात ठेवून घेतली जाते. म्हणजे पद घटनात्मक आहे, पण कृत्य घटनाबाह्य आहे. मग त्याचं समर्थन कसं होऊ शकेल? त्यांना काय सर्व गुन्हे माफ करू शकतो का आपण? नाही करू शकत”, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams bhagatsingh koshyari on supreme court verdict pmw