भारतीय जनता पार्टीचे नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत असतात. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी युती करून बाळासाहेबांचं (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) हिंदुत्व सोडलं अशी टीका त्यांच्यावर होत असते. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिलं. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, परवा पत्रकार परिषदेत मला एकाने प्रश्न विचारला त्यावर मी उत्तर दिलं की आमच्याकडे (इंडिया आघाडी) पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत, महिला आहेत, शिक्षण आणि वयोमानानुसार वेगवेगळे पर्याय आहेत. मात्र, त्यांच्याकडे (भाजपा) पर्याय नाही. त्यांच्याकडे एकच नाव आहे आणि तेही आता कमी पडतंय म्हणून आपल्या बाळासाहेबांचा फोटो त्यांना लावावा लागतोय. एकमेव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरावा लागतोय. कधी बजरंग बली की जय असं म्हणावं लागतंय, तर कधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव घ्यावं लागतंय.

उद्धव ठाकरे म्हणाले, मला असं सांगण्यात आलं आहे की, हे लोक येत्या २३ जानेवारीला म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषबाबूंच्या जयंतीच्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन करणार आहेत. म्हणजे हे म्हणायला मोकळे, बघा आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीच उद्घाटन केलं. अरे, पण तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय? ते त्यांच्या कर्तृत्वाने हिंदूहृदयसम्राट झाले आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही आहात. ते सगळ्यांचे आदर्श आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, इंग्रजांविरोधात ‘चले जाओ’चा नारा दिला त्यात भाजपा नव्हती. त्यांची मातृसंस्था (आरएसएस) तरी होती का? मागे संजय राऊत यांनी लिहिलं होतं, यांच्या जनसंघाचे जनक म्हणजेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला होता असं म्हणतात. त्यानंतर भारत छोडो आंदोलन कसं चिरडून टाकायला हवं यासाठी त्यांनी इंग्रजांना पत्र लिहिलं होतं. त्याचे दस्तऐवज आहेत. हे लोक इतरांना घराणेशाहीवरून बोलतात, मग यांची विचारांची घराणेशाही काढायला हवी. कोणत्या विचारातून तुम्ही आला आहात, कोणत्या विचारातून तुमचा पक्ष जन्माला आला आहे ते काढलं पाहिजे.

हे ही वाचा >> Aditya L1 : ‘आदित्य एल१’ची हनुमान उडी, पुण्यातील ‘या’ संस्थेचा सहभाग अभिमानास्पद, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मला अभिमान आहे मी बाळासाहेब आणि माँ (मीनाताई ठाकरे) यांच्या पोटी जन्माला आलो, परंतु, तुम्हाला माझे वडील चोरावे लागतात तेव्हा मला तुमची कीव येते. तुम्ही ना आदर्श देऊ शकता ना धड विचार देऊ शकता. काल यांनी पोस्टर लावले, बाळासाहेबांनी काँग्रेसला विरोध केला होता. अरे, बाळासाहेबांनी विरोधा केला होता. परंतु, बाळासाहेबांनी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना काढली नव्हती. मी कमळाबाई हा शब्द मुद्दाम वापरला कारण तो बाळासाहेबांचा शब्द आहे. मला त्याची आठवण करून द्यायची होती म्हणून मी हा उल्लेख केला.

Story img Loader