येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाची अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. तसेच देशभरातही उत्साहाचं वातावरण आहे. मंदिर समितीने शेकडो संत-महंत, राजकारणी, क्रिकेटपटू, कलाकार, समाजसेवकांना या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आहे. हजारो दिग्गजांच्या उपस्थितीत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. परंतु, राम मंदिरासाठी आंदोलन करणाऱ्यांपैकी शिवसेनेला या सोहळ्याचं निमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २२ जानेवारी रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे की, राम मंदिरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हायला हवी. राजकारणी लोकांनी तिथे बसावं, त्याला आमची हरकत नाही. परंतु, हा राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते पूजा व्हायला हवी. ते लोक (मंदिर समिती, भाजपा) राष्ट्रपतींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतील किंवा कदाचित करायचे नाहीत. परंतु, आम्ही मात्र काळाराम मंदिरातल्या पूजेसाठी राष्ट्रपतींना आमंत्रित करणार आहोत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कारसेवकांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायला हवं. बाबरी मशिदीच्या घुमटावर चढून झेंडा फडकावणारे अनेक कारसेवक दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत. परंतु, सुदैवाने जे आज हयात आहेत त्यांना त्या कार्यक्रमाला बोलावून त्यांचा सन्मान करावा. कारण त्यांनी जर ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं. आज झेंडे लावायला त्या घुमटावर जे लोक चढत आहेत, ते लोक चढू शकले नसते. जर कारसेवक त्यावेळी बाबरीच्या घुमटावर चढले नसते. तर हे लोक आज झेंडे फडकवू शकले नसते. झेंडे लावायला अनेकजण येतात. परंतु, लढायची वेळ होती तेव्हा तुम्ही कुठे होता असा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर कोणाकडेच नसतं. आज तिथे झेंडे लावणाऱ्यांकडे तर या प्रश्नाचं उत्तर नाही.
हे ही वाचा >> “…तिथे बोलायची तुमची हिंमत नाही”, मराठा-ओबीसी संघर्षावरून रोहित पवारांचा भुजबळांना टोला; म्हणाले, “केवळ समाजांमध्ये…”
देशाच्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला टोला लगावत उद्धव ठाकरे म्हणाले, २२ जानेवारी रोजी दिवाळी साजरी करायला हरकत नाही. परंतु, देशाचं जे दिवाळं यांनी काढलंय, त्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. त्यामुळे दिवाळी जरूर साजरी करा. कारण आपलं राम मंदिर होतंय. परंतु, गेल्या १० वर्षात देशाचं दिवाळं निघालंय त्यावरही चर्चा व्हायला हवी.