दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन असून त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात एकीकडे दावे-प्रतिदावे सुरू असताना ठाकरे गट आणि भाजपा यांच्यातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तिथे गोमूत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’ केल्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटालाही लक्ष्य केलं.
“शिवसेनाप्रमुखांबद्दलचा त्यांचा उमाळा आता…!”
“शिवसेनाप्रमुख म्हणजे संघर्ष आलाच. अन्यायाविरुद्ध लढा आलाच. मला हा स्मृतीदिन वेगळा वाटतोय, कारण काहींना शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर १० वर्ष लागली ते कोण होते हे समजायला. आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा त्यांचा उमाळा बाहेर आला आहे. अनेक शिवसेनाप्रमुख प्रेमी आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करायला हरकत नाहीये. मात्र, ते करताना याचा कुठे बाजार होऊ नये, ही माझी नम्र भावना आहे. विचार व्यक्त करण्यासाठी कृती असावी लागते. कृती नसेल, तर तो विचार राहत नाही, बाजारूपणा येतो. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कुणी मांडू नये. विचारांना साजेसं काम करावं, एवढीच विनंती आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपाला सुनावलं
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपालाही सुनावलं आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनाप्रमुखांचं स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावं, अशी मागणी केली आहे. “बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक कुणाच्या वैयक्तिक कुटुंबाचं नाही. ते स्मारक महाराष्ट्राचा स्वाभिमान व्हावं. त्यासाठी राज्य सरकारनं ते ताब्यात घेऊन त्याची संपूर्ण देखभाल करावी. स्मारकाच्या देखभालीसाठी एखादी समिती स्थापन करून ठाकरे कुटुंबातील एखाद्या सदस्याची तिथे नेमणूक करावी”, अशी मागणीवजा सल्ला प्रसाद लाड यांनी दिला आहे. या सल्ल्याचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे.
“देवेंद्र फडणवीसांचा राजकारणातला डीएनए नेमका…”, उद्धव ठाकरेंचं टीकास्र; उपमुख्यमंत्रीपदावरून टोला!
“त्यांनी स्वप्न जरूर बघावीत”
पत्रकारांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारणा केली असता उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपाला सगळ्याचाच ताबा पाहिजे. तो द्यायचा की नाही, हे देशातल्या जनतेनं ठरवायचं आहे. सगळंच आपल्या बुडाखाली घ्यायचं, हाच भाजपाचा मनसुबा आहे. देशात लोकशाही आहे. स्वप्न बघणं हा लोकशाहीतला अधिकार आहे. त्यांनी ती जरूर बघावीत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.