केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आजच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थ्यमंत्र्यांनी महिलांचा विकास, शेतकरी, गरीब कल्याण, रोजगार या गोष्टींवर भाष्य केलं. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता विरोधी पक्षांकडून या अर्थसंकल्पावर टीका सुरू झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे टोप्या घालण्याचा प्रकार आहे असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाला आहे. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना कुठेही जातपात किंवा धर्मभेद केला नाही. निसर्ग चक्रीवादळ आलं, तौत्के चक्रीवादळ आलं, तेव्हा किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या सर्वांना मदत केली. भाजपा आमच्यावर आरोप करते की, आम्ही हिंदुत्व सोडलं. परंतु, हाताला काम आणि हृदयात राम हेच आमंच हिंदुत्व आहे. आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका करता मग आता तुम्हाला नितीश कुमार कशासाठी हवेत आहेत? याच नितीश कुमार यांनी एक महिन्यापूर्वी संघमुक्त (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) भारत करण्याची घोषणा केली होती. त्याच नितीश कुमारांना तुम्ही ‘आ गले लग जा’ असं म्हणत मिठ्या मारताय. याचाच अर्थ तुम्हाला सर्वजण हवे आहेत. तुम्ही सगळ्यांना ईडी-सीबीआयची भीती दाखवून आपल्या पक्षात किंवा युतीत घेणार आणि वर ‘अबकी पार ४०० पार’ची टिमकी वाजवणार.
उद्धव ठाकरे भाजपाला उद्देशून म्हणाले, तुम्ही येत्या निवडणुकीत ४०० पार होणार आहात तर मग तुम्हाला नितीश कुमार कशाला हवे आहेत? झारखंड मुक्ती मोर्चातील वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात का टाकताय? आधी ४०० पार व्हा, मग सोरेन यांना तुरुंगात टाका. ४०० पार होणार आहात तर मग घाईघाईने राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा का केलीत? तुम्हाला राम मंदिर हवं आहे आणि नितीश कुमारही हवे आहेत. तुमच्याकडे येतील त्यांच्यावरील खटले मागे घेतले जात आहेत. हे सगळं काय चाललंय. ४०० पारबाबत दावा करताय आणि नितीश कुमारांना आपल्याबरोबर घेताय, ही कसली भीती आहे?
हे ही वाचा >> निर्मला सीतारमण यांची कर्मचारी वर्गासाठी बजेटमध्ये मोठी घोषणा? ४ दिवस काम, ३ दिवस आराम पण पगार..
अर्थसंकल्पावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, पूर्वी जादूचे प्रयोग व्हायचे, आताही होत असतील. जादूगार कसे प्रयोग दाखवतो ते तुम्ही पाहिलं नसेल तर दिल्लीत जे जादूचे प्रयोग सुरु आहेत ते बघा. जादूच्या प्रयोगांत मी लहान असताना बघायचो, जादूगार यायचा रिकामी टोपी दाखवयाचा त्यावर फडकं ठेवायचा आणि एक मंत्र म्हणायचा आबरा का डबरा. त्यानंतर रिकाम्या टोपीत हात घालायचा आणि कबूतर काढून दाखवयाचा. हवेत ते कबूतर उडवायचा. आपण म्हणायचो हा अचाट माणूस आहे रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं त्यामुळे माझं मत यालाच. त्यावेळी आपल्या लक्षात आलं नाही कबूतर उडून गेलं आणि टोपी आपल्याला घातली. हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचाच प्रकार आहे.