राज्यात सत्तापालट झाल्यानंतर सगळीच राजकीय समीकरणं बदलताना दिसू लागली आहेत. भाजपाचं संख्याबळ सर्वात जास्त असूनही देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवल्याचा दावा शिंदे गट आणि भाजपाकडून केला जात असला, तरी शिवसेना त्यांना शिवसैनिक मानायला तयार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसेल, कारण…”

आरेच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी रात्रीस खेळ चाले हे त्यांचं ब्रीदवाक्य झाल्याचा टोला लगावला. “आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. मला दु:ख झालंय ते म्हणजे माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याने मला दुख झालं आहे. रात्रीस खेळ चाले, हे त्यांचं आता ब्रीदवाक्य आहे. एका रात्रीत आरेमध्ये झाडांची कत्तल झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याला कांजूरमार्गचा पर्याय सुचवला. कामावर स्थगिती दिली. मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे. संभ्रम निर्माण होतो, तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरी असं माझं मत आहे”, असं ते म्हणाले.

आरेमधील बिबट्याचा वावर…

सत्तेवर आल्यानंतर आरे कारशेडसंदर्भात नव्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आरेमधून कांजूरमार्गला नेलेलं कारशेड पुन्हा आरेमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यावरून पर्यावरणवाद्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना उद्धव ठाकरेंनी त्यावरून राज्य सरकारला आवाहन केलं आहे.

Eknath Shinde CM: “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही,” उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; अमित शाह यांना केली विचारणा

“मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना विनंती आहे की..”

“माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेचा आग्रह रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाची हानी होईल. आत्ता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत. पण मधल्या काळात तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो समोर आला होता. म्हणजे तिथे वन्यजीव आहेत. मला धोका हा वाटतो की आत्ता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर तिथे रहदारी सुरू झाल्यावर आजूबाजूच्या पर्यावरणातलं वन्यजीवन धोक्यात येईल. असं करता करता मग आता तिकडे काहीच नाही म्हणत अजून पुढे जाल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पाहा नेमकं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले…

उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल; राजीनामा देताना म्हणाले होते, “मी आता पुन्हा…”!

“कांजूरमार्गला मेट्रो कारशेड झालं तर…”

“आम्ही मुंबईतलं जवळपास ८०० एकरचं जंगल राखीव करून टाकलं आहे. कांजूरमार्गची जमीन महाराष्ट्राची आहे. ती महाराष्ट्राच्या, मुंबईच्या हितासाठी वापरा. आरेचा मर्यादित वापर होणार होता. कांजूरला कारशेड गेल्यानंतर ती मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकेल”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams cm eknath shinde devendra fadnavis bjp on aarey car shed pmw