गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना कोणती? शिंदे गट की ठाकरे गट हा वाद रंगला आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे केले जात आहेत. यासंदर्भातला वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. शिवाय, पक्षनाव आणि पक्षचिन्ह कुणाला वापरता येणार? यासंदर्भातला अंतिम निकाल निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. यावेळी निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याआधी सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा निकाल यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अपात्रतेचा निर्णय आधी यावा – उद्धव ठाकरे
“१६ जण अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे. घटनातज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे त्याचा निर्णय आधी लागावा अशी आमची इच्छा आहे. आयोगानं जे काही मागितलं, ते सगळं आम्ही आयोगाला पुरवलं आहे. पण नंतर हे गद्दार गट सांगायला लागले की आमच्याकडे आमदार-खासदार जास्त आहे. एखाद्याला ओसरी राहायला दिली तर तो उद्या घरावर अधिकार सांगायला लागला असा तो प्रकार झाला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“जर एकतर्फीच निर्णय घ्यायचा असता तर…”
“निवडून आलेल्या प्रतिनिधींवरच ठरवायचं असतं, आयोगाने एकतर्फी बाजू घेण्याचा निर्णय घेतला असता तर दोन-तीन महिन्यांपूर्वीच आयोग निकाल देऊ शकत होता. पण मधल्या काळात त्यांनी आम्हाला जो खटाटोप करायला लावला, तो आम्ही व्यवस्थित केला आहे. मधल्या काळात आमच्या शपथपत्रांवरही आक्षेप घेतला. मग तो आक्षेप का घेतला? जर तुम्हाला ती मानायचीच नव्हती, तर मग आक्षेप का घेतला? त्यांना आता कळलंय की यांचं पारडं जड आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“शिंदे गटाचे आमदार अपात्र होणारच आहेत”
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे आमदार अपात्र होणारच असल्याचा ठाम दावा केला. “घटनेला काहीतरी अर्थ असतो. उगीच तो कागदपत्रांचा खेळ नसतो. त्यामुळे घटनेनुसार आयोगाने काही कायदे केले आहेत. त्यांचं पूर्ण पालन आम्ही करतो. त्याचवेळी कार्याध्यक्ष वगैरे पदं आम्ही घटनेनुसार निर्माण केली. आयोगाच्या मान्यतेनुसारच आम्ही कारभार करतो. आता त्यांची अडचण ही झालीये की त्यांनी व्हीप मोडला आहे. त्यामुळे ते अपात्र तर होणारच. अपात्र झाल्यानंतर पुन्हा दावा कसा सांगणार? त्यामुळे यात वेळ लागावा, विलंब व्हावा म्हणून ही खुसपटं काढायची आणि नको तो युक्तीवाद तिथे करायचा याला काही अर्थ नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटावर हल्लाबोल केला.