ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी अखेर रविवारी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आपण विकासकामांसाठी शिंदे गटात आल्याचा दावा रवींद्र वायकर यांनी केला. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे गोरेगावमध्ये झालेल्या एका सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंनी गोरेगावमधील ठाकरे गटाच्या शाखेला भेट दिली. यावेळी तिथे झालेल्या सभेत ते बोलत होते. त्यांनी शिंदे गटाबरोबरच भारतीय जनता पक्षावरही हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“गद्दारांचं नशीब चांगलं आहे की…”

“शिवसैनिकांचं प्रेम खोक्यातून मिळत नसतं. शिवसेनेच्या मुळावर कुणी घाव घालत असताना हा शिवसैनिक गप्प बसेल का? गद्दारांचं नशीब आहे की आज शिवसेनाप्रमुख नाहीयेत. नाहीतर यांची कधीच वाट लागली असती. मी थोडा संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी लढणारच नाही. पण तुम्हाला काढून टाकण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे”, असं ते म्हणाले.

“देवेंद्रजी, गुजरात म्हणजे पाकिस्तान नसेल तर…”

दरम्यान, महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेल्याच्या विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी पाकिस्तानचा उल्लेख करत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावरही उद्धव ठाकरेंनी तोंडसुख घेतलं. “काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही. गुजरात आमचाच आहे. पण देवेंद्रजी, गुजरात म्हणजे पाकिस्तान नसेल तर मग महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“हे फक्त पक्ष फोडतायत. पण पक्ष फोडणं म्हणजे काही हिंदुत्व नाहीये. ही तुमची नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती आहे. कारण तुम्ही आजपर्यंत काहीच केलं नाही. आजही माझं आव्हान आहे त्यांना की लोकसभेबरोबर महापालिका आणि विधानसभेचीही निवडणूक घ्या. एकदाच काय तो तुमचा खात्मा करून टाकतो. तुम्हालाही त्रास नाही आणि आम्हालाही त्रास नाही. वन नेशन, वन इलेक्शन घ्या. एकदाच काय तो तुमचा फडशा पाडून टाकतो. दोन वर्षं झाल्यानंतरही महापालिका निवडणुका घेण्याची यांची हिंमत नाहीये”, असं आव्हान यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलं.

“कोस्टल रोडशी मोदींचा दुरान्वयानेही संबंध नाही”

दरम्यान, कोस्टल रोड हे शिवसेनेचं स्वप्न होतं, असं उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितलं. “कोस्टल रोड हे आपलं शिवसेनेचं स्वप्न आहे. ते आपण, महापालिकेनं पूर्ण केलं आहे. त्यात मिंध्यांनी काहीही केलेलं नाही. देवेंद्र फडणवीसांचं तर सोडूनच द्या आणि पंतप्रधानांचा तर त्याच्याशी दुरान्वयानेही संबंध नाही. आता त्याच्या अर्धवट रस्त्याचं उद्घाटन करत आहेत. एकच मार्गिका खुली करत आहेत. कशाला घाई करताय? श्रेय घेण्यासाठी हे चालू आहे”, असं ते म्हणाले.

“मला भाडोत्री जनता पक्षाला सांगायचंय, आजपर्यंत तुम्ही आमची मैत्री पाहिली. आता जरा मशालीची धग बघा तुमच्या खुर्चीचं बुड कसं जाळून टाकते ती”, असं खोचक आव्हानही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams cm eknath shinde on ravindra waikar pmw