माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने वीर सावरकरांबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केलेल्या विधानानंतर राज्यात सुरु असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला लक्ष्य केलं आहे. भाजपा आणि शिंदे गट हे ‘नकली हिंदुत्ववादी’ असल्याचं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे. या अग्रलेखामध्ये पुण्यातील आंदोलनामध्ये शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात केलेल्या जोडे मारो आंदोलनादरम्यान सावरकरांच्या फोटोला जोडे मारण्याच्या चुकीवरुन ठाकरेंनी थेट शिंदे गटाची अक्कलच काढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार? CM शिंदेंबरोबर ‘ट्रायडंट’मध्ये झालेल्या भेटीनंतर म्हणाल्या, “राजकीय चर्चा म्हटलं तर शिंदे गटात जाण्याचा…”

नेमकं प्रकरण काय?
राहुल गांधींनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुण्यातील सारसबागेसमोरील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन शिंदे गटाचे पुणे संपर्क प्रमुख अजय भोसले आणि शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनातील बॅनरवर एका बाजूला राहुल गांधी यांचा लाल फुल्ली मारलेला आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो होता. सर्वजण घोषणाबाजी करीत असताना अचानक एक महिला कार्यकर्ती पायातील जोडे काढून बॅनरवरील सावरकरांच्या फोटोला जोडे मारण्यासाठी पुढे सरसावली. या महिलेची गल्लत होत असल्याचं एका कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्याने महिलेस रोखलं आणि तिला तिची चूक दाखवून दिली. त्यामुळे ही महिला वेळीच थांबली. मात्र आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आता थेट उद्धव ठाकरे गटाने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा, शिंदे गट ‘नकली हिंदुत्ववादी’
अग्रलेखाच्या सुरुवातीलाच भाजपा आणि शिंदे गटाच्या हातात राहुल गांधींनी कोलीत दिल्याचं म्हणत ठाकरेंनी घडलेला प्रकार नको व्हायला हवा होता असं मत व्यक्त केलं आहे. तसेच भाजपा व शिंदे गटास ठाकरेंनी ‘नकली हिंदुत्ववादी’ म्हटलं आहे. “भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मिंधे गटाचे वीर सावरकर प्रेम अचानक उफाळून आले, पण त्यांना ही अशी उफाळण्याची संधी राहुल गांधी यांनी दिली. हा सर्व प्रकार टाळता आला असता तर बरे झाले असते. ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. जनतेचा प्रतिसादही उदंड लाभला. हे सर्व उत्तम चालले असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजपा व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती हे खरेच. त्यामुळे नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके लागले,” असं लेखात म्हटलं आहे.

एकंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ
“राहुल गांधी व त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधींना सोडून सावरकरांनाच जोडे मारल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला व त्याचा निषेध केला पाहिजे, पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही, असा एकंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ सरकारात उडालेला दिसतोय,” असा खोचक टोला शिंदे गटाच्या पुण्यातील आंदोलनामध्ये घडलेल्या प्रकारावरुन ठाकरे गटाने लगावला आहे.

नक्की वाचा >> “RSS, भाजपाचा स्वातंत्र्य लढ्यात काडीइतकाही संबंध नव्हता तसा तो सावरकरांच्या…”; ठाकरेंकडून हल्लाबोल, राहुल गांधींनाही सुनावलं

हे अकलेचे शत्रू शिवसेनेला…
“सावरकरांच्या हिंदू महासभेवर तर या लोकांनी आगपाखडच केली. त्यामुळे सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत. मिंधे गटाचे लोक तर राहुल गांधी समजून वीर सावरकरांनाच रस्त्यावर जोडे मारीत आहेत. असे हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकरांचे विचार समजवायला निघाले आहेत,” अशी टीका लेखातून करण्यात आली आहे.

यास ढोंग नाही म्हणायचे तर काय?
“गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपाचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्यांची भूमिका वठवतात. यास ढोंग नाही म्हणायचे तर काय? वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपावाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात. पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात, हाच संशोधनाचा विषय आहे,” असंही लेखात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams cm group over incidence in pune where eknath shinde supporters mistakenly tried to hit veer savarkar photo instead of rahul gandhi scsg