Shivsena Uddhav Thackeray on Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी त्यांचा विक्रमी अर्थसंकल्प सादर केला. सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्याच केंद्रीय अर्थमंत्री ठरल्या आहेत. मात्र, या अर्थसंकल्पाबाबत विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. बिहार व आंध्रप्रदेश या दोन राज्यांसाठीच अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या व त्या राज्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर सरकारला पाठिंबा दिल्याची ही परतफेड होती अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता ठाकरे गटानं अर्थसंकल्पावरून सरकारवर हल्लाबोल केला असून राज्यातही महायुतीमध्ये मतभेद होऊ लागल्याचा दावा करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“केंद्राच्या डोळ्यात महाराष्ट्रद्वेषाचा वडस…”

“बिहारमधील पूर नियंत्रणासाठी साधारण १८ हजार कोटी दिले, पण अर्थमंत्री निर्मलाबाईंना महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती व त्यातून उद्ध्वस्त झालेले संसार, शेती यांचे दर्शन घडले नाही. हा महाराष्ट्रद्वेषाचा वडस केंद्राच्या डोळ्यात वाढल्याचा परिणाम आहे. निर्मलाताई ‘बजेट’ पेश करीत असताना महाराष्ट्रात देवेंद्रभौ फडणवीस हे हाती कागद-पेन्सिल घेऊन टिपणे काढीत होते (तसा फोटू प्रसिद्ध झाला आहे) व सर्व संपल्यावर ‘महाराष्ट्रावर अन्याय झाला नाही हो’ अशी बोंब त्यांनी ठोकली. त्यांच्या बोंबाबोंबीत मग इतरांनीही सहभाग घेतला”, अशा शब्दांत ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४

अजित पवार-गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी!

“केंद्राला सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राला काय मिळाले हे सांगायला कोणी तयार नाही. महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे. निधी वाटपावरून अजित पवार व देवेंद्रभौंचे ‘लाडके भाऊ’ गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाली. ‘आता पैसा जमा करण्यासाठी जमिनी विकू काय?’ असा त्रागा अर्थमंत्री अजित पवारांनी केला, पण उपमुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय बजेटची आकडेमोड करीत बसले आहेत”, असा दावा ठाकरे गटानं केला आहे.

विकासाची ‘गाडी’ रोखणाऱ्यांना प्रगतीची ‘बुलेट’ कशी दिसणार? अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांचा टोला

“हे तर लोकसभा निकालाने पीडित बजेट”

“केंद्रीय अर्थसंकल्पाची लोक मजा घेत आहेत. ‘हम दो, हमारे दो’ अशा पद्धतीचे हे सरकार आहे. म्हणजे मोदी-शहा हे दोघे त्यांच्या दोन खास उद्योगपतींसाठीच सरकार चालवीत आहेत. आता अर्थसंकल्पही ‘हमारे दो’ म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांसाठीच बनवला. म्हणजे सरकारचे ‘हमारे दो’ हे धोरण कायम आहे. ‘लोकसभा निकालाने पीडित Budget’ अशी टिप्पणीसुद्धा बजेटबाबत चपखल बसते”, अशी खोचक टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

“देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला”

“जनतेने गुजरात व्यापार मंडळाचे बहुमत काढून घेतले, पण त्याची ना खंत ना खेद! सत्ता टिकविण्यासाठी देशाच्या अर्थसंकल्पाचा वापर करणारे नादान व्यापारी मंडळ म्हणून यांचा उल्लेख इतिहासात होईल. लोकसभा निकालाने पीडित Budget पेश करून व्यापार मंडळाने आपण ईस्ट इंडिया कंपनीचे वारसदार असल्याचे सिद्ध केले. देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

“मागचे बजेट हे ‘अयोध्या’ व ‘राममय’ होते. या बजेटमध्ये अयोध्या आणि रामाचा साधा उल्लेख नाही ही बाब विशेष नमूद करण्यासारखी आहे”, असा टोलाही ठाकरे गटानं लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams devendra fadnavis ajit pawar on budget 2024 pmw