२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना आणि भाजपाचं नेमकं बंद दरवाजाआड काय ठरलं होतं? याविषयी अनेक दावे करण्यात आले. अजूनही अमित शाह व उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यावेळी नेमकं काय ठरलं होतं? याविषयी परस्परविरोधी दावे केले जात आहेत. त्यानंतर शिवसेनेचं भाजपाशी फाटलं आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. पुढचा राजकीय इतिहास सर्वश्रुत असून आता पुन्हा एकदा देशात आणि महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा ज्वर चढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकद एकमेकांच्या केलेल्या कथित फसवणुकीबाबत दावे केले जात आहेत. त्यातच उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन मोठा दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यामध्ये त्यांनी अमित शाह व भारतीय जनता पक्षानं दिलेला शब्द पाळला नसल्याचा पुनरुच्चार केला. पण यावेळी मात्र त्यांनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख करून मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करण्याचं वचन दिलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून नव्याने राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील अनैसर्गिक आघाड्या व युतीबाबत विचारणा केली असता त्यासाठी उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्ष व अमित शाह यांना जबाबदार धरलं.

“मोदी पंतप्रधान झाल्यावर स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं”

“हे सगळं कुठे सुरू झालं? लोकांना हे माहिती आहे. आम्ही हिंदुत्व व राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षासोबत होतो. भाजपानं आमच्याबरोबर हे का केलं? माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य बघतो. चांगलं चाललं होतं. माझ्या वडिलांचं २०१२मध्ये निधन झालं, तेव्हा मोदी आमच्या घरी आले होते. २०१४मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आता कुठे आहेत ते?”, शरद पवारांचा विखे पाटलांबाबत खोचक सवाल; म्हणाले, “त्यांचा पराक्रम…”

“अमित शाह पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर मात्र त्यांची चालच बदलली. २०१४च्या निवडणुकीआधी अमित शाहांनी विचारलं तुम्ही सर्व्हे केला आहे का? मी म्हटलं आम्ही लढणारी माणसं आहोत, आम्ही सर्वे करत नाही. शिवाजी महाराजांनी सर्व्हे केला नव्हता. जर सर्वेमध्ये असं दिसलं की तुमचा पराभव होणार आहे, तर तुम्ही लढणंच सोडून देता का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वाटाघाटींसाठी कोण आलं?

“सुरुवातीला प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी असे भाजपाचे नेते आमच्याशी वाटाघाटी करण्यासाठी येत असत. तेव्हा आमच्यात जागांसाठी चढाओढ व्हायची. पण आता त्यांनी उर्मटपणा व आकड्यांचा वापर सुरू केला आहे. त्यांनी राजस्थानमधले भाजपा नेते ओम माथूर यांना आमच्याशी चर्चा करायला पाठवलं. भाजपाला असं वाटलं की आता बाळासाहेब हयात नाहीत, तर हल्ला करायची हीच वेळ आहे. वापरा आणि फेकून द्या ही त्यांची गॅरंटी आहे. तेच त्यांनी २०१९मध्ये माझ्याबाबत केलं”, असा आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

देवेंद्र फडणवीसांचं ‘ते’ आश्वासन!

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंबाबत आश्वस्त केल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला. “मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होईल. अडीच-अडीच वर्षांसाठी शिवसेना व भाजपाचा मुख्यमंत्री होईल, हे अमित शाहांसोबतच्या चर्चेत ठरलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की ते माझा मुलगा आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि ते स्वत: दिल्लीत जातील. पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं ठरवलं”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे.

मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल

“मला भाजपाचा असा एक मित्रपक्ष सांगा जो आनंदी आहे. आज एनडीएमध्ये फक्त अस्ताव्यस्त झालेले लोक आहेत. ते स्वत:च्या नेत्यांच्या बाबतीतही हेच करतात”, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams devendra fadnavis amit shah on split alliance with bjp pmw