लोकसभा निवडणुकीचे टप्पे १९ एप्रिल पासून सुरु होतील. १ जूनपर्यंत ही निवडणूक चालणार आहे. अशात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी अमित शाह आणि उद्धव ठाकरे सोडताना दिसत नाहीत. तसंच देवेंद्र फडणवीसही खास शैलीत टीका करताना दिसतातच. उद्धव ठाकरेंनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी अमित शाह यांचं वक्तव्य खोडून काढलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते अमित शाह?

“शिवसेना आम्ही फोडलेली नाही. पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं कन्येवर प्रेम असल्याने फुटली” असा उल्लेख अमित शाह यांनी केला आहे. त्याबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी यावरुन अमित शाह यांना जोरदार उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

अमित शाह यांचं भाजपातील स्थान काय आहे? आता भाजपाचे अध्यक्ष वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत हे तेच सांगू शकतील. मला अमित शाह यांना सांगायचं आहे की तुम्ही आणि तुमचे चेलेचपाटे वेगळ्या गोष्टी बोलत असतात. तुमच्यात आणि तुमच्या चेलचपाट्यांमध्ये एकवाक्यता असू द्या. काही दिवसांपूर्वी फडणवीस म्हणाले होते की मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो. अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

हे पण वाचा- Amit Shah on Uddhav Thackeray: “शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आम्ही फोडले नाहीत”, अमित शाह काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस लग्नात येऊन ३५ पोळ्या खातील आणि नवरा-बायकोमध्ये भांडणं लावतील अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. आता उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चेलेचपाटे असा केला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली होती. आम्ही जर गडकरींच्या कामांची यादी वाचून दाखवली तर तुम्हाला चार पेले कोमट पाणी प्यावं लागेल असं फडणवीस म्हणाले होते . आता उद्धव ठाकरेंनी त्यांना चेलेचपाटे म्हणत डिवचलं आहे.

अमित शाह यांच्या पुत्रप्रेमाणुळे भारत विश्वचषक हरला

अमित शाहांना मला सांगायचे आहे की, तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप हरलाय. महाराष्ट्रात खुलेआम गुंडाराज सुरु आहे. कोण कोठेही जाऊन गोळीबार करतय. यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. यांचे राज्य चालवण्याकडे कोणतेही लक्ष नाही. तरिही यांना जनतेची मतं पाहिजे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams devendra fadnavis and amit shas scj