लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशात सात टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. अशात प्रचार सभांचा धडाका सुरु झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं. २०१९ च्या निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन हे त्यांचं वाक्य गाजलं होतं. मात्र २०१९ ला ते घडू शकलं नाही. मात्र २०२२ मध्ये ते घडलं. दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी त्यांना उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

“सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल. ‘मी पुन्हा येईन’ असं म्हटलं होतं. २०१९ ला आम्ही (भाजपा-शिवसेना) निवडून आलो. पण आमचं सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे आम्हाला काहीजण अहंकारी म्हणाले. हे तर राजकारणात सुरुच राहतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

२०१९ ला गाजली होती पुन्हा येईनची घोषणा

२०१९ च्या निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन ही देवेंद्र फडणवीस यांची घोषणा गाजली होती. त्यांनी विधानसभेच्या शेवटच्या दिवशी एक कविता म्हणून दाखवली होती. त्यात या ओळी होत्या. २०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हापासून प्रत्येकानेच त्यांची या वाक्यावरुन यथेच्छ खिल्ली उडवली होती. शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली ती याच वाक्यावरुन. मात्र देवेंद्र फडणवीस यांननी याबाबत तुम्हाला सगळ्यांना माफ केलं असं वक्तव्य शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर झालेल्या विशेष अधिवेशनात केलं होतं. तर दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असं देवेंद्र फडणवीस रविवारी म्हणाले. आता याच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी हिंगोलीतल्या सभेत उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“काही लोकांना अभिमान कसला असतो? की आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. अरे घडफोडे तुम्ही. यांना घरफोडीचं लायसन्स देऊन टाका. हे घडफोडे आहेत. तुमचं चिन्ह कमळ नको, त्यापेक्षा हातोडी वगैरे ठेवा. कारण तुमच्या पक्षांत ना नेते तयार झाले, आदर्श तयार झाले नाहीत. नेत्यांचा आदर्श सोडाच आदर्शवाले नेते त्यांनी घेतले. कारण विचार किंवा काही शिल्लकच नाही.”

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यात निरीक्षण नोंदवलं आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीत.. शरद पवारांसारखा माणूस संपूर्ण राज्य पिंजून काढतो आहे. त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्या पक्षाचं नाव चोरता आणि फोटोही चोरता? इतकी बेशरम अवलाद कधी महाराष्ट्रात पाहिली नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

भाजपा म्हणजे अधिकृतरित्या खंडणी गोळा करणारी टोळी झाली आहे. निवडणूक रोख्यांचा इतका हातोडा पडला आहे. पण निर्ल्लजं सदासुखी अशी ही अवस्था आहे. माझ्या वडिलांचा म्हणजेच बाळासाहेबांचा फोटो लावण्यापेक्षा ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचे फोटो दाखवा असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams devendra fadnavis over his statement on me punha yein scj