महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…” (मी पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेन) अशी घोषणा दिली होती. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजपाचं सरकार आलं नाही. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या ‘मी पुन्हा येईन…’ या घोषणेवरून अनेकदा ट्रोल केलं गेलं. अजूनही अनेकदा फडणवीस यांच्या या घोषणेवरून त्यांची थट्टा केली जाते. आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे फडणवीसांच्या या घोषणेचा उल्लेख करत त्यांना टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यांमध्ये गृहमंत्री अमित शाह दोन वेळा पुणे दौऱ्यावर येऊन गेले आहेत. त्यापाठोपाठ काल (मंगळवार, १ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. यावेळी टिळक स्मारक समितीच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीचा गौरव करण्यात आला. त्यापाठोपाठ आता पुन्हा एकदा अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार आहेत. २६ ऑगस्ट रोजी शाह यांचा पुणे दौरा नियोजित आहे. मोदी-शाह सातत्याने पुण्यात येत असल्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना मोदी आणि शाह यांच्या पुणे दौऱ्यांविषयी विचारलं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असं असेल काहीतरी”.

हे ही वाचा >> संभाजी भिडेंच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा उल्लेख करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “याची संस्था…”

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस जर भिडे यांना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर आहे असं म्हटलं पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणाले, आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाळत आहोत. त्यातून काही मिळणार नाही. इतिहासात गुंतवून ठेवायचं आणि देशाला त्यापाठोपाठ राज्याला मारायचं ही पद्धतच घातक आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांना चांगले धडे द्यावेत हीच अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams devendra fadnavis saying me punha yein over modi shah frequent pune visit asc