गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगर पालिकेकडून कोविड काळात देण्यात आलेल्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत त्याबाबत ईडीकडून चौकशी चालू आहे. या चौकशीचे धागेदोरे ठाकरे कुटुंबीयांपर्यंत गेल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. यावरून सत्ताधारी भाजपा आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालू असतानाच आज ठाकरे गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी या सर्व प्रकारावर परखड भाष्य केलं. यावेळी त्यांनी पीएम केअर फंडावरूनही मोदींना खोचक टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाजपाच्या हातून देश कधीच सुटलाय”

कोविड काळातील कारभारावरून भाजपाकडून सातत्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आपला देश फक्त या देशावरच्या संस्कारांमुळे आणि देशवासीयांच्या संयमामुळेच चाललाय. भाजपाच्या हातातून देश कधीच सुटलाय. तुम्ही फक्त उद्धव ठाकरेला खलनायक करत आहात. जनता ठरवेल मी नायक आहे की खलनायक. पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला पक्कं माहिती आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“जळणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे माझ्यामागे जास्त”

“मी मुद्दाम कोविडबद्दल बोलणार आहे. आजही मी जिथे कुठे जातो, तिथे मला भेटणारे लोक मला नमस्कार करून म्हणतात साहेब तुमच्यामुळे आम्ही वाचलो. राज्याबाहेरचे लोक मला सांगतात की उद्धवजी, तुमच्याबरोबर हे लोक जे करतायत ते आम्हाला आवडत नाही. जळणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे कित्येक पटींनी माझ्यामागे उभे आहेत. कोविड काळातील मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी जरूर करा. आम्ही घाबरत नाही. पण त्यावेळी एपिडेमिक अॅक्ट होता. पंतप्रधानांनी डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्ट आणला होता. अर्थात, अशा आणीबाणीच्या परिस्थितीत नियमांच्या पलीकडे जाऊन लोकांचा जीव वाचवण्याला तुम्हाला प्राथमिकता द्यावी लागते. ती आपण दिली”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या टीकेला उत्तर दिलं.

“हिंमत असेल तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत…”

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी देशभरातील सर्व राज्यांच्या कारभाराची चौकशी करण्याचं आव्हान मोदी सरकारला दिलं. “चौकशीच करायची असेल, तर ठाणे महापालिकेची करा. संजय केळकरला आता कदाचित किंमत नसेल. कारण देवेंद्रलाच किंमत नाहीये तिथे केळकरांना विचारतंय कोण? ठाण्याचे आमदार संजय केळकरांनी ठाणे महापालिकेची चौकशी करण्याची मागणी केलीये. हे चौकशी करत नाहीयेत. पिंपरी-चिंचवड पालिकेत कोविड काळात तिथल्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनला रंगेहाथ पकडला होता. तो भाजपाचा होता. पुणे महापालिका, नागपूर महापालिकेची चौकशी करा. तुमच्यात हिंमत असेल, तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांच्या कारभाराची चौकशी करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झालाय, ते आमची काय चौकशी करणार? टीव्हीवरच्या चर्चांमध्ये मागणी झाली की सुरत, गुवाहाटी, गोवा चार्टर्ड प्लेनच्या खर्चाचा तपशील द्या. पण तो दिला जात नाही”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“हे एकनाथ शिंदेच तुम्हाला एक दिवस…”, देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचा टोला; ‘त्या’ शायरीवरून केलं लक्ष्य!

“त्या पीएम केअर फंडची चौकशी करा. तिथे तर टाटांनी एकरकमी दीड हजार कोटी दिले होते. पीएम केअर फंड हा चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. मग पीएमचा अर्थ काय? तो काय हास्यजत्रेतला प्रभाकर मोरे केअर फंड आहे का? आगं शालू… माहितीये ना तुम्हाला? प्रभाकर मोरे केअर फंड. काढून टाका त्याचं नाव. पीएम केअर फंडचा अर्थ काय? कशासाठी तिथे लोकांनी पैसे दिले आहेत? इथल्या काही भाजपाच्या लोकप्रतिनिधींनीही महाराष्ट्रात पैसे न देता प्रभाकर मोरे केअर फंडला पैसे दिले. मग ते पैसे गेले कुठे? तिथे लाखो करोडो रुपये गोळा झाले. महाराष्ट्राला दिलेले व्हेंटिलेटर्स बिघडलेले होते. कुणाचं पाप आहे हे? कुणाच्या डोक्यावर फोडायचं हे? तुम्ही आमची चौकशी जरूर करा, पण आम्हीही तुमची चौकशी करणार. का नाही करायची?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

“आता कुठे गेलं तुमचं ‘माय फ्रेंड ओबामा’?”

“अमेरिकेत बराक ओबामा त्यांच्याविरोधात बोललेत. आता कुठे गेलं माय फ्रेंड बराक? आता बराक ओबामा बोलतील तर हा आंतरराष्ट्रीय कट आहे मला बदनाम करायचा, मोदी विरुद्ध जग असं म्हणतील. मग इथे उद्धव ठाकरे विरुद्ध आख्खा भाजपा आहे त्याचं काय?”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams pm care fund mocks narendra modi as prabhakar more pmw
Show comments