आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईत पार पडलेल्या स्थानिक लोकाधिकार समिती मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावर टीकास्र सोडलं. “महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, त्यांनी भाजपाची नीती मित्रपक्ष व स्वपक्षातील नेत्यांनाही संपवण्याची असल्याचं म्हणत त्यांनी नितीन गडकरींनी यासंदर्भात विधान केल्याचा दाखला दिला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना काही ग्रामस्थांनी रेकॉर्ड केलेले फोन कॉल पाठवल्याचं सांगितलं. “मला काहींनी फोन रेकॉर्ड पाठवले आहेत. भाजपाकडे भाडोत्री लोक खूप आहेत. भाड्याच्या एजन्सी लावून त्यांनी फोन सुरू केले आहेत. कुणालाही फोन येतो, तुम्ही मोदी सरकारला मत देणार का वगैरे विचारतात. मग ते गरीब लोक विचारतात की आधी मला सांगा हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे? मोदी काय त्यांच्या खिशातून खर्च करतायत का? हा माझ्या देशाचा पैसा आहे. गॅस सिलेंडरचा दर २०१४ साली काय होता, आज काय झालाय? आता काय म्हणून मी त्यांना मत देऊ?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा केंद्राला कर म्हणून एक रुपया देतो, तेव्हा त्यातून परत फक्त ७ पैसे महाराष्ट्राला मिळतात. मग बाकीचे पैसे कुणाच्या बोडक्यावर घालताय तुम्ही? मोदी गॅरंटीमध्ये बराचसा मोठा हिस्सा महाराष्ट्राच्या कष्टाच्या पैशांचा आहे. महाराष्ट्राला तुम्ही काय देताय? आम्ही जो एक रुपया केंद्राला देतोय, त्यातला किमान ५० टक्के वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र ओरबाडता आहात. आम्हाला आमच्या हक्काचा पैसा पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आपण कधीच सूडाचं राजकारण केलं नाही”
शिवसेनेनं कधीच सूडाचं राजकारण केलं नाही, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “आपण कधी सूडाचं राजकारण केलं नाही. काँग्रेसनं शिवसेना फोडली असेल, शरद पवारांनी शिवसेना फोडली असेल, आपण राष्ट्रवादीमधली काही लोकं फोडली असतील, काँग्रेसमधले काही लोक आपल्याकडे आले असतील. पण म्हणून जेव्हा सत्ता हातात आली तेव्हा यातल्या कुठल्याही पक्षानं दुसरा पक्ष संपवण्याचा कधी विचार नाही केला”, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
“जिंकल्यानंतर समोरच्याला संपवून टाकेन ही पाशवी वृत्ती आता जोर धरू लागली आहे. ती चिरडून टाकावी लागेल. जर्मनीत एका हिटलरचा असा शेवट झाला की आता जर्मनीत पुन्हा हिटलर जन्माला येणं अशक्य आहे. अशी ही वृत्ती चिरडून टाकायला पाहिजे. ही कसली वृत्ती आहे? तुम्ही तुमच्या विरोधकांना, मित्र पक्षांना, तुमच्या पक्षातल्या नेत्यांना संपवत आहात. नितीन गडकरी हे बोलले आहेत की त्यांना पक्षात काही स्थानच राहिलेलं नाही. त्यांना सन्मानच मिळत नाहीये. नितीन गडकरी दिल्लीत गेल्यानंतर आम्हाला आशा होती की त्यांच्या कामामुळे देशाला मोठा फायदा होईल. पण गडकरी जेव्हा म्हणतात की तिथे काही स्थानच राहिलेलं नाही, तर मग कुणासाठी काम करायचं?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.