जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या लाठीहल्ल्याचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. अशातच राज्यातल्या विरोधी पक्षांचे नेते अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलकांची, तसेच पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांची भेट घेत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काही वेळापूर्वी अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा मोर्चाचे समन्वयक आणि ज्यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू आहे, त्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच आंदोलकांशी चर्चा केली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य सरकारच्या या निर्घृणपणाचा जाब विचारावा लागेल. त्यासाठी आपल्याला थोडा संयम ठेवावा लागेल. मराठा समाजाचं, त्यांच्या मोर्चांचं आणि आंदोलनांचं नेहमीच कौतुक झालं आहे. इतके मोठे मोर्चे निघाले, परंतु, त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे सर्वांनीच तुमचं कौतुक केलं आहे. मी आत्ता जरांगे पाटलांना म्हटलं तुमची देहयष्टी बघा, त्यात हे उपोषण करताय. दुसऱ्या बाजूला हे सरकार जिथे माता-भगिनींची टाळकी फोडायला हे लोक मागेपुढे बघत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आम्ही तुमच्या बरोबरच आहोत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की मला आत्ताच जरांगे पाटील म्हणाले, “आज रात्री आणखी पोलीस आणून आम्हाला इथून उठवतील”. त्यामुळे मी या सरकारला आव्हान देतोय. इथल्या लोकांच्या केसाला जरी हात लावलात तर मी अख्खा महाराष्ट्र इथे आणून उभा करेन. हे कोणी अतिरेकी नाहीत, चीन किंवा पाकिस्तानातून आलेले लोक नाहीत. हे इथल्या मातीत जन्माला आलेले लोक आहेत. इथले राजे आहेत.
हे ही वाचा >> “सरकारच्या कार्यक्रमात अडगळ नको म्हणून…”, उद्धव ठाकरेंचा लाठीहल्ल्याबाबत जालन्यातून गंभीर आरोप
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मी या निर्घृण सरकारला सांगतोय, तुम्ही चुकीच्या लोकांशी पंगा घेतलाय, हे रझाकारांशी लढणाऱ्या लोकांचे वारसदार आहेत. शूरवीरांचे वारसदार आहेत. ही संतांची भूमी आहेच, पण ही वीरांचीदेखील भूमी आहे. इथल्या लोकांनी संतांची शिकवण अजून सोडली नाही, ती सोडायला तुम्ही भाग पाडू नका. रझाकारांच्या विरोधात लढा देणारी ही माणसं आहेत. यांच्याबरोबर पंगा घेऊ नका.