उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा कुटुंब संवाद दौरा सुरू आहे. आज त्यांची धाराशिव येथे सभा झाली. या सभेत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपावर टीका केली. “इतर पक्षाप्रमाणे आमचे आमदार-खासदार फोडले की, शिवसेना संपेल, असे भाजपाला वाटले असेल. पण शिवसेना तशी संपणार नाही. शिवसेना भाजपाला गाडून, मूठमाती देऊन पुढे जाईल. पण शिवसेना संपणार नाही. काल परवा देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. मणिपूर पेटले असताना त्यांची तिकडे जाण्याची हिंमत नाही. तिकडे शेपूट घालतात आणि महाराष्ट्रात फणा काढत आहेत”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीकास्र सोडले.
होय मविआ पंक्चर झालेली रिक्षा असेल…
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “जम्मू-काश्मीरमध्ये जायची त्यांची हिंमत नाही, तिथे शेपूट घालतात. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची घुसखोरी सुरू आहे, तिथेही शेपूट घालतात आणि असे शेपूट घालणारे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढून गेले. महाराष्ट्रात येऊन त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. मविआ म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे, असे ते म्हणाले. आमची रिक्षा पंक्चर झाली असेल कारण ती साध्या माणसाची रिक्षा आहे. पण तुमचे ट्रिपल इंजिनच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत.”
आमच्यावर आरोप करताना भाजपाचे नेते म्हणतात की, आम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलो. पण धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आठवण करून दिली की, मोदी नाव कुणाला माहीत नव्हते, तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपाला आणि मिंधे गटाला आमचे नेते, वडील चोरण्याची वेळ आली आहे. माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केला तरी यांना हिंदूहृदयसम्राट होता आलेले नाही.
मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी लातूरमध्ये सभा झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझा ‘छोटा भाऊ’ असा उल्लेख केला होता. आता भाजपाने ‘मोदी का परीवार’ असे कँम्पेन सुरू केले आहे. मी मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब, माझी जबाबदारी, असे अभियान सुरू केले होते. मोदींनी माझे कुटुंब माझ्यापासून नेले, पण जबाबदारीचं काय? मी आजही महाराष्ट्राची जबाबदारी घ्यायला तयार आहे. यावर्षी मे-जूनमध्ये मोदींना माजी पंतप्रधान म्हणावे लागेल, अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
भाजपाच्या तिजोरीत हजारो कोटी कसे आले?
मोदी-शाह यांची रेकॉर्डिंग अडकली आहे. तेच तेच वाक्य ते पुन्हा बोलत आहेत. निवडणूक रोख्यांचा गैरव्यवहार आता समोर आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियातून जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असेल तर त्या कशा मागे लागतात, हे सर्वांनाच माहीत आहे. जप्तीच्या नोटीसा लावतात, घर, दार सर्व गहाण ठेवतात. कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो. एवढे सगळे रेकॉर्ड बँक ठेवू शकते. मग हजारो कोटींची उलाढाल असलेला निवडणूक रोख्यांचा तपशील बँकेकडे नाही? सर्वोच्च न्यायालयाने तपशील उघड करण्याचे आदेश देऊनही बँकेने तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे. सामान्य शेतकऱ्यांचा रेकॉर्ड ठेवता, तसे या चोरांचे रेकॉर्ड बँकेकडे कसे नाही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.