सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात मोठे भगदाड पडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रमुख शिवसैनिकांनी बैठक घेतली. यावेळी ठाकरे यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी सोलापुरात लवकरच येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी संतोष सिदगौडा पाटील यांची नेमणूक जाहीर करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे व माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाप्रमुख पदावर संतोष सिदगौडा पाटील यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यांच्यावर दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बैठकीत उध्दव ठाकरे यांच्यासमोर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ व उपनेते शरद कोळी या दोघांनी केवळ एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांच्यासोबत इतर कोणीही गेले नसल्याचा दावा केला. पक्ष नव्या दमाने काम करणार असल्याचा विश्वास देण्यात आला.
शहरप्रमुखपदी सचिन चव्हाण
दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानेही सोलापूर शहरप्रमुखपदी सचिन मोहन चव्हाण यांची नेमणूक केली आहे. सचिन चव्हाण हे लमाण समाजाचे असून त्यांच्या पत्नी भाजपच्या माजी नगरसेविका असून आमदार सुभाष देशमुख यांच्या विश्वासू मानल्या जातात.