Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापौर बंगला या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचं कामही सुरु झालं आहे तसंच गेल्या काही वर्षांपासून याबाबत चर्चाही सुरु आहे. आर्टिटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांचे धन्यवाद देतो. कारण हे काम आत्ता छान वाटतं आहे पण ते करणं जिकिरीचं होतं. एक महत्त्वाचा योगायोग म्हणजे या स्मारकाच्या शेजारीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचंही स्मारक आहे. महापौर बंगला या वास्तूशी आम्ही भावनिकरित्या जोडलो गेलो आहोत” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू, वैभव जपून काम पूर्ण झालं आहे-उद्धव ठाकरे

महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे, वास्तूला धक्का न लावता, इथलं वैभव जपून काम करणं कठीण होतं. सीआरझेडचा कायदाही होता. आभा लांबा यांनी भूमिगत स्मारक करुया ही कल्पना मांडली. समुद्राचा रेटा जमिनीच्या खालूनही मोठा असतो. ते आव्हान स्वीकारुन हे काम पूर्ण करण्यात आलं. खबरदारी घेऊन वास्तू उभी करणं महत्त्वाचं काम होतं त्यामुळे आभा लांबा यांचे मी आभार मानतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. चार भिंती आणि नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही. टप्पा दोन आता सुरु होईल. शिवसेनाप्रमुख यांचा जीवनपट स्मारकात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आत्मचरित्र कधीच लिहिलं नाही. त्यांना विचारलं की ते म्हणायचे मी मैदानावरचा माणूस आहे. त्यांचं आयुष्य खुल्या पुस्तकाप्रमाणे होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक असं झालं पाहिजे की जे विचार त्यांनी आपल्या देशाला, राज्याला दिले तेच विचार त्यांच्या स्मारकानेही दिले पाहिजेत. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

जन्मशताब्दी वर्षाच्या आत स्मारकाचं लोकार्पण होईल अशी आशा-उद्धव ठाकरे

२३ जानेवारी २०२६ पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतं आहे. त्याच्या आत आम्ही हे स्मारक त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी ठेवू. मी या वेळीही जनतेला आवाहन करतो आहे की आराखडा तयार झाला आहे. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीत महाराष्ट्र पिंजून काढला. आपल्याकडे जुने फोटो, भाषणं, काही जुन्या बातम्या, लेख असतील त्याचे फोटो, बातम्या हे कृपा करुन आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते मार्गदर्शन करणारं साहित्य ठरेल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”

बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले नाहीत असे सगळेच इथे येऊ शकतात-ठाकरे

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं तेव्हा जे कुणी उपस्थित होते त्यांना, सरकारला तुम्ही आमंत्रित करु इच्छिता का? असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडलेले नाहीत असे सगळे आजही या ठिकाणी येऊ शकतात. टप्पा दोनमध्ये काय असेल त्याची थोडी उत्सुकता ठेवतो आहे. ती कायम राहिली पाहिजे. त्यांचे विचारच स्मारकाच्या निमित्ताने पोहचवण्याचा आमचा विचार आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा असेल किंवा नसेल ते बघू. कारण पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही.”

श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही-उद्धव ठाकरे

या स्मारकाचं श्रेय कुणाला जाणार? असं विचारलं असता, स्मारकाचं उद्घाटन करताना जे सरकार असेल त्यांना श्रेय जाईल. मी सरकार बदलणार, वगैरे काहीही म्हटलं नाही. श्रेयवादाची लढाई व्हायलाच नको. यात काय श्रेयाची लढाई लढायची? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आहेत असे कुणीही या स्मारकाचं श्रेय घेऊ शकत नाहीत. श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही. बाळासाहेबांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलं. ज्यांना बाळासाहेब काही देऊ शकले नाहीत त्यांनी स्मारकातून तरी काहीतरी घ्यावं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं उद्घाटन कुणाच्या हातून होईल? हा मुद्दा लांबचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर राष्ट्रीय स्तरावरचं हे स्मारक आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील का? असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी त्यावेळी जे पंतप्रधान असतील ते येऊ शकतील असं उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray statement about balasaheb thackeray memorial he said this thing scj