Uddhav Thackeray बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली? या संदर्भातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी विरोधकांनी केली. एवढंच नाही तर धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही अशी भूमिकाच विरोधकांनी घेतली होती. दरम्यान आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला. तो त्यांनी स्वीकारला आणि राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांनीही राजीनामा स्वीकारला आहे. या सगळ्या प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच प्रमाणे देवेंद्र फडणवीस पारदर्शी कारभार करत आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

संतोष देशमुख यांच्या हत्येचे ते फोटो दोन महिन्यांपासून ते फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते का? याचं उत्तर आता त्यांनीच द्यायचं आहे. तसंच धनंजय मुंडे म्हणत आहेत प्रकृती अस्वस्थ असल्याने राजीनामा दिला आहे तर अजित पवार म्हणाले आहेत की त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. नेमका राजीनामा कशासाठी झाला आहे? तसंच जे काही फोटो आणि व्हिडीओ बाहेर आले आहेत त्यानंतरही त्यांचा राजीनामा का घेतला नाही याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा कुठल्या कारणाने झाला आहे?

धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे. मात्र राजीनामा नेमका काय कारणाने दिला आहे ते कारण समोर आलं पाहिजे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जनतेचे प्रश्न समोर आले आहेत त्याची उत्तरं दिली पाहिजेत. तसंच जनतेने अनेक ठिकाणी बंद वगैरे केले आहेत. जनप्रक्षोभ होऊ नये असं वाटत असेल तर सरकारने उपाय योजले पाहिजेत. आत्ता हे सरकार मजबूत आहे. हीच वेळ आहे महाराष्ट्रातून गुंडागर्दी घालवली पाहिजे भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याची हीच वेळ आहे. नाहीतर मग आता लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका गुंड सरकारने आणली पाहिजे. महाराष्ट्र बदनाम होतो आहे हे जास्त क्लेशदायक आहे.

देवेंद्र फडणवीस पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागतच-उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. मात्र पारदर्शी कारभार करताना त्यांचे हात कुणी बांधत आहेत का? हादेखील प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आता या सगळ्याचा वीट आला आहे. जनतेला त्यांच्या समस्या सोडवणारं सरकार हवं आहे. एकमेकांच्या व्यथांवर पांघरुण घालणं योग्य नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच फोटो आधी त्यांच्याकडे होते का? याचं उत्तर दिलं पाहिजे असही उद्धव ठाकरे म्हणाले.