Uddhav Thackeray : फटाक्याची वात लावायची आणि पळून जायचं हे भाजपाचं धोरण आहे. फटाका फुटला की यायचं आणि सांगायचं वात आम्हीच लावली होती. पण वात लावल्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला. तसंच वक्फ विधेयक जमिनींवर डोळा ठेवून आणण्यात आलं आहे असाही आरोप केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनाही प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
फटक्याची वात लावायची आणि पळून जायचं हे भाजपाचं धोरण आहे. फटाका फुटल्यावर मिरवत यायचं की आम्हीच वात लावली. पण वाट लावली त्याची जबाबदारी कोण घेणार? वाट लागल्यानंतर आपण यायचं या वृत्तीला आमचा विरोध केला आहे. जमिनी बळकावून व्यापारी मित्रांना जे देणार आहेत त्यालाही आम्ही विरोध केला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
जिनांनाही लाज वाटली असेल असं मुस्लिमांचं लांगुलचालन भाजपाने केलं
जिनांनाही लाज वाटली असेल अशी भाषणं करण्यात आली. जिनांनी जे केलं नाही ते भाजपाचे नेते आणि त्यांचे सहकारी पक्ष यांनी करुन दाखवलं. जर ते आम्हाला हिंदुत्व सोडलं म्हणत आहेत तर मग काल भाजपाने काय सोडलं होतं? जे तुम्ही करत होतात ते लांगुलचालनच होतं. कारण तुम्हाला समोर निवडणूक दिसते आहे. फोडा आणि राज्य करा ही भाजपाची नीती आहे. मला हे सांगा या बिलाचा हिंदुत्वाशी काय संबंध आहे?
देवेंद्र फडणवीस वाजपेयींच्या विचारांवर चालणार की जिनांच्या?
देवेंद्र फडणवीस जे काही आम्हाला विचारत आहेत माझा त्यांना सवाल आहे की ते अटलबिहारी वाजपेयींच्या विचारांवर चालणार आहेत की मोहम्मद अली जिना आणि नवाज शरीफ यांच्या विचारांवर चालणार आहेत? जी भाषणं लोकसभेत झाली ती जिा यांना लाजवणारी होती. शिवाय बाळासाहेबांचे विचार वगैरे सांगू नका. तुम्ही लहान असाल तेव्हा..बाळासाहेब ठाकरेंनी इस्तेमासाठी मु्स्लिम बांधवांना जागा दिली होती. ती तुमच्या सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाला दिली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्हाला शिकवू नका. तुम्ही तेव्हा बच्चे होतात. असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं होतं?
“वक्फ सुधारणा विधेयक संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?”, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.