शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून… अशा शब्दांत शपथ घेण्यास सुरूवात केली.
त्यांनी शपथ घेतली ती अशी :
”छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन… आणि संविधान व कायदा यानुसार वागताना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्या विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.”
”मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.”
…आणि आतषबाजी झाली!
हा शपथविधी पार पडताच शिवाजी पार्कच्या आसपास फटाक्यांची आतषबाजी झाली. तसेच उद्धव ठाकरे यांनी शपथपत्रावर स्वाक्षरी केली. त्यांनंतर त्यांनी उपस्थित सर्वांना नमस्कार केला व अभिवादन केले.