Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Marathi News: सर्वोच्च न्यायालयाकडून वारंवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून सुनावलं जात असताना उद्धव ठाकरेंनी आज दसरा मेळाव्यानिमित्त केलेल्या भाषणात त्या मुद्द्याचा उल्लेख केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, देशात सर्वोच्च न्यायालय, अस्तित्वात राहणार आहे का? लोकशाही अस्तित्वात राहणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी एक विनोदही सांगितला.
“जवळपास एक वर्ष होऊन गेलं. आपण सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेचा मुद्दा घेऊन गेलो आहोत. तारखेवर तारीख. काय करायचं तेच कळत नाही. सर्वोच्च न्यायालय लवादाचं कानफाट प्रत्येक वेळी फोडलंय. पण निर्लज्जम सदासुखी. कानफाट फोडलं तरी गाल चोळत सांगतात आम्ही आमचं वेळापत्रक सादर करू. ठीक आहे तुम्ही तुमचं वेळापत्रक द्यायचं तेव्हा द्या. हे सगळं बघितल्यावर एक विनोद मला आठवतो”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एक विनोद ऐकवताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
उद्धव ठाकरेंनी सांगितला विनोद!
“एकदा भरल्या कोर्टात न्यायमूर्ती एका २० वर्षांच्या मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणाची सुनावणी घेत असतात. आरोपीच्या पिंजऱ्यात एक आजोबा काठी टेकत येतात. न्यायाधीशांचं डोकं फिरतं. ते म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही? आजोबा असूनही तुम्ही २० वर्षांच्या मुलीची छेड काढता? आजोबा म्हणतात, न्यायाधीश महाराज, ही घटना घडली, तेव्हा मीही २० वर्षांचाच होतो. इतकी वर्षं झाली, तरी केस चालूच आहे”, असं उद्धव ठाकरेंनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
“जालन्यात मराठा समाजावर लाठीचार्जचा आदेश देणारा डायर कोण? अजूनही…”, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
“माझं स्पष्ट म्हणणं आहे. ठीक आहे, तुम्ही अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावायचा तो लावा. २० वर्षांनी, ५० वर्षांनी लावा. पण आज संपूर्ण देश, संपूर्ण जग फक्त अपात्रतेच्या निर्णयाकडे बघत नाही. भारतात सर्वोच्च न्यायालयाला हा लवाद जुमानत नसेल, तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे की नाही? या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचं अस्तित्व राहणार आहे की नाही? भारतमातेची लोकशाही टिकणार की नाही याकडे आमचं लक्ष आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिले मनोज जरांगे पाटलांना धन्यवाद; म्हणाले, “त्यांनी…
“माझं तर म्हणणंय की…”
“अपात्र कुणाला ठरवणार? जनतेनं कोण अपात्र आहे हे ठरवून टाकलं आहे. माझं तर म्हणणं आहे की केसचा निकाल लागण्याआधी निवडणुका घेऊन दाखवा. जनता ठरवेल की ते पात्र आहेत की अपात्र आहेत. होऊन जाऊ द्या. पण सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहेत”, असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.