पंतप्रधान नरेंद्र मोदी सात समुद्र पार अमेरिकेत जाऊन आले. नंतर मध्य प्रदेशात प्रचाराचा नारळ मोदींनी फोडला. नारळ फोडताना काही शिंतोडे राष्ट्रवादीवर उडवले. राष्ट्रवादीने ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं मोदींनी सांगितलं. आणि चार दिवसानंतर एक गट फुटून गेला. आम्हीच राष्ट्रवादी असे हा गट सांगतो. आता ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांबरोबर मोदींचा फोटो येणार आहे. हे हिंदुत्व पटतं का? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला आहे. ते यवतमाळमधील दिग्रस येथील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये जाऊन प्रचार करतात. पण, मणिपूरमधील परिस्थिती भयानक आहे. देशातील एक मणिपूर ‘मणी’ हा तुटतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये जाण्याचं सोडा, त्याबद्दल बोलण्यासही तयार नाहीत.”
हेही वाचा : VIDEO : “…तर राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती?” उद्धव ठाकरे यांचा भाजपाला थेट सवाल
“मणिपूर शांत करायचा असेल, तर उपाय सांगतो. तुम्ही अन्य पक्षातील लोकांवर भ्रष्टाचारी म्हणून आरोप करता. त्यांच्या कुटुंबाची निंदानालस्ती करता. घरावर धाडी टाकण्यात येतात. गरीब झोपडीत राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी सुद्धा ईडी आणि इन्कम टॅक्स पाठवता. तुमच्या अधिकाऱ्यांत हिंमत असेल, तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयला मणिपूरला पाठवा. आरोप केल्यानंतर सगळे तुमच्यासमोर शेपूट *न येतात. तसे, मणिपूर पेटवणारे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या भीतीने तुमच्या पक्षात आले, तर मणिपूर शांत होऊन जाईल,” असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे.
हेही वाचा : VIDEO : “शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर…”, पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान
“आमदार, खासदार गेले तरी दमदार शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोहरादेवीला आलो होतो. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. तेव्हा पोहरादेवीच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याला निधी दिला. मला वाटलं बांधकामाला वेळ लागेल. येथील रस्तेही निट नाही. मग निधी गेला कुठे? का त्यातूनही हफ्ता खाण्यात आला? याची चौकशी कोण करणार?” असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे.