शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा पार पडली. या सभेत काँग्रेसमधून आलेल्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी हातात शिवबंधन बांधलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लक्ष्य केलं आहे. सुक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे रोज वाट्टेल ते बोलतात. कारण, त्यावर त्यांचं पोट चालते, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काँग्रेस तुम्हाला रोज किती शिव्या देते, त्या तुम्ही मोजता. पण, भोक पडलेली टिनपाट लोक, हे रोज माझ्यावर बोलत आहेत. विनायक राऊत सांगत होते, आमच्याकडं एक आणि त्यावर दोन फ्री असणाऱ्यांची एवढी पंचायत झाली की, त्यांना काय सांभाळावे कळत नाही. दोन पोरं सांभाळायला गेलं, तर डोक्यावरचा टोप खाली पडते. टोप सांभाळायला गेलं, तर पोर सुटतात,” अशी खिल्ली उद्धव ठाकरेंनी राणेंची अप्रत्यक्षपणे उडवली आहे.

हेही वाचा : बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी महाडमध्ये केली मोठी घोषणा; सरकारला इशारा देत म्हणाले…

“त्यामुळे सूक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी आली आहे. रोज वाट्टेल ते बोलतात. कारण, त्यावर त्याचं पोट चालते,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“उद्धव ठाकरेचं सगळं काही काढून घेतलं, तरी माझी भीती का वाटते? बारसूत तमाशा केला. बारसूत उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत, असं सांगितलं. होय आहेत… कारण बारसूतील नागरिक माझे नातेवाईक आहेत. मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय. तुम्ही उपऱ्यांसाठी लढत आहात,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

हेही वाचा : भरत गोगावलेंना बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी केलं लक्ष्य; म्हणाले, “शंभर नाहीतर…”

“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून शिवसेनून बाहेर पडलो, अशी बोंब ठोकली जाते. पण, काय हिंदुत्व सोडलं? मी तर प्रत्येक सभेत विचारतो. एक गोष्ट सांगा मी हिंदुत्व सोडल्याची? हिंदुत्व काय आहे, हे समजून घ्या… आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलंय, ‘मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेकी आणि देशद्रोह्यांना बडवणारा हिंदू पाहिजे,'” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray taunt narayan rane nitesh rane and nilesh rane mahad sabha ssa