संभाजी भिडेंबाबत मी काय बोलणार? शासनकर्ते जे आहेत त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया कशी काय देणार? राज्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे हे योग्य आहे आणि अयोग्य आहे असं म्हणत संभाजी भिडेंच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच फडणवीस जर भिडे यांना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
इतिहासात गुंतवून ठेवायचं आणि…
आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाळत आहोत. त्यातून काही मिळणार नाही. इतिहासात गुंतवून ठेवायचं आणि देशाला आणि राज्याला मारायचं ही पद्धतच घातक आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी चांगले धडे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत हीच अपेक्षा आहे असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मी मुख्यमंत्री होतो तेव्हा महिलांबाबत भाषण केलं होतं. तसंच शक्ती कायदाही आपण आणला होता. शिवसेनेने ज्यांना महिला म्हणून विधान परिषदेच्या उपाध्यक्षपदी बसवलं त्यांच्याकडून चर्चाच न होऊ देणं ही वागणूक अनपेक्षित आहे. विचारसरणीत इतका कसा काय बदल झाला? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या वडिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. तसंच त्यांनी महात्मा फुलेंबाबत आणि राजाराम मोहनरॉय यांच्याविषयीही अनुद्गार काढले. त्यावरुन त्यांच्या अटकेची मागणी केली जाते आहे. विधानसभेत आजही त्या घटनेचे पडसाद उमटले. जितेंद्र आव्हाड यांनीही याविषयी आक्रमक भूमिका घेतली होती. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांना भिडे गुरुजी असंच संबोधलं जातं. त्यामुळे आम्ही गुरुजी म्हणतो, आमच्यासाठी ते गुरुजीच आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी याच वाक्यावरुन देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.