Uddhav Thackeray मनसेचा गुढीपाडवा मेळावा ३० तारखेला म्हणजेच येत्या रविवारी पार पडणार आहे. यासंदर्भातल्या टिझरसाठी राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो घेतले आहेत. याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांवरही टीका केली आहे.

राज ठाकरेंबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“सर्वांना बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावाचून पर्याय नाही हेच त्यातून दिसतं आहे. जर महाराष्ट्र जिंकायचा असेल तर बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागेल. या गद्दारांनीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरलाच होता. त्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाही.” असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला आहे. आता गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यावरुन उत्तर देतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

एसंशि म्हणजे शिवसेना नाही ती गद्दार सेना

मी उघडपणे सांगतो आहे की शिवसेना यूबीटी वगैरे काही नाही. शिवसेना एकच आहे. जी काय दुसरी आहे ती गद्दार सेना आहे. जी तोडफोड कुणाल कामरा जिथे होता तिथे झाली त्याच्याशी शिवसेनेचा संबंध नाही. ती गद्दार एसंशि सेना आहे. मुख्यमंत्र्यांनी बचाव कुणाचा केला? तर ज्याचं नाव नाही घेतला त्याचा. एसंशिची बदनामी झाली असं त्यांना वाटत असेल तर याचा अर्थ एसंशि गद्दार आहे.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांचा उल्लेख मिस्टर बिन असा केला होता. मिस्टर बिननी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती आम्ही ती बाहेर काढली असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे गद्दारांचा गट असं म्हटलं आहे.

५० खोके एकदम ओके हे लोकही म्हणतच होते-उद्धव ठाकरे

सत्य हे सत्यच असतं. गावागावात ५० खोके एकदम ओके म्हणत होते. लोकांनी बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलांवरही लिहिलं होतं ५० खोके एकदम ओके. तसंच गद्दारांचे हे प्रश्न फडतूस आहेत. सौगात ए सत्ताचा प्रकार जो काही चालला आहे त्यानिमित्ताने भाजपा जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलंय? तसंच आम्ही हा सत्ता जिहाद आहे म्हणायचं का? असाही प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला. आत्तापर्यंत भाजपाने धार्मिक विष पेरलं. ज्या धर्मात तुम्ही विष पेरलं त्या धर्मामध्येच तुम्ही घरोघरी जाऊन अन्न देत आहात. तुम्हाला त्यांना विष द्यायचं आहे की अन्न हे तरी एकदा सांगा. असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.