बुलडाण्याचा पैलवान बाला रफिक शेख याने यावर्षीचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. गुणांच्या जोरावर बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने गतविजेता अभिजित कटकेला पराभूत केले. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यात अभिजितला अपयश आले. ११-३ अशा गुणाने बाला रफिक शेखने अभिजितला धूळ चारली. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाला रफिक शेखचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर असून तिथेच सत्कार करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लढतीच्या सुरुवातीलाच अभिजितने एक गुणांची कमाई केली होती. आक्रमक सुरुवातीमुळे सामना अटीतटीचा होईल असे वाटले होते. परंतु, नंतर बाला रफिकने ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावर गुणांची वसुली केली. बालारफीने आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर अभिजितला पुनरागनाची संधीच लाभली नाही.

बुलडाण्याचा बाला रफिक पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला पराभूत केले. तर अभिजितने सोलापूरच्या रवींद्रला चीतपट केले होते. बाला रफिक शेखने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. बाला रफिकने मानाची गदा पटकावल्यानंतर त्याचे ६५ वर्षीय वडील आझम शेख यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यांना हा आनंद शब्दात सांगता येत नव्हता. अत्यंत भावुक होऊन त्यांनी मुलाच्या विजयी उत्सव साजरा केला.

पुण्यातील नव्या दमाच्या २१ वर्षीय अभिजितसमोर बलाढ्य आणि अनुभवी बाला रफिक शेखचे आव्हान होते. त्यामुळे त्याची विजयासाठी कसरत होण्याची शक्यता होती. परंतु, ही लढत एकतर्फीच झाल्याचे दिसून आले. गुणांवर बाला रफिकने अभिजितला पराभूत केले. माती विभागात आतापर्यंत बाला रफिकने तीन वेळा फायनलपर्यंतचा पल्ला गाठला होता. त्यामुळे तो कसलेला मल्ला मानला जातो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray to felicitate maharshtra kesari bala rafiq sheikh
First published on: 24-12-2018 at 13:08 IST