शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा आयोगाने निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्रिय निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. “शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. तसेच भाजपाला आधी गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, असं म्हणत खोचक टोला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल, तर कोणती शिवसेना खरी आहे हे पाहायला इकडं या. हा ‘चुना लगाव आयोग’ आहे. ते सत्तेचे गुलाम आहेत. वरून जे आदेश येतात त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत, हे मी उघडपणे बोलतो आहे.”
“शिवसेनेची स्थापना आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली”
“कारण निवडणूक आयोगाने या तत्वानुसार शिवसेना शिंदे गटाची असल्याचं सांगितलं ते तत्वच खोटं आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे. कदाचित तिकडं वरती निवडणूक आयोगाचे वडील बसले असतील. मात्र, ते आयोगाचे वडील असतील, माझे नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.
व्हिडीओ पाहा :
“भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या एकजुटतेवर घाव घालत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. त्या हिंदुत्वाला धुमारे फुटत असताना शिवसेना फोडण्यात आली. यांना कोण विचारत होतं, भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं.”
हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तिथंच विषय संपला, कारण…”, हरिश साळवेंचा सर्वोच्च न्यायालयात आक्रमक युक्तिवाद
“त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून पाहावा”
“तेव्हा शिवसेनाप्रमुख यांच्यामागे उभे राहिले नसते, तर हे आज दिसले नसते. मात्र, हे निष्ठुर आणि निर्घृणपणे वागत आहेत. ज्यांनी साथ दिली त्यांनाच संपवत आहेत. त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून पाहावा,” असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं.