माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्यांनी पेंढापूर येथे शेतकऱ्यांची भेट घेत ओल्या दुष्काळाचीही पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून आता राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. शिंदे गटातील काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून खोचक टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी २४ मिनिटांचा दुष्काळ पाहणी दौरा केल्याची टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. दुसरीकडे, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं. “उद्धव ठाकरे आज १५ मिनिटांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते, याची मी बातमी पाहिली. मला वाटतं की, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या घरी चहा प्यायला गेलं तरी २० मिनिटं लागतात. पण १५ मिनिटांत दुष्काळ पाहणी दौरा होतं असेल तर यासारखं आश्चर्य नाही”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

हेही वाचा- “जेव्हा सैनिक कामचुकारपणा करतात, तेव्हा…” सुषमा अंधारेंचा शिंदे गटातील नेत्यांना टोला

विरोधकांच्या या टीकेला मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी २४ मिनिटांचा दौरा केला, हे पाहण्यासाठी तुम्ही घड्याळ लावून बसले होते का? असा खोचक सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे. त्या ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

हेही वाचा- “कार्यकर्त्यांच्या घरी चहा प्यायला २० मिनिटं लागतात, उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे…” संजय शिरसाटांची खोचक टोलेबाजी!

शिंदे गटातील नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांनी २४ मिनिटांचा दौरा केला, असं म्हणायला तुम्ही काय घड्याळ लावून बसले होते का? आमचा दौरा २४ मिनिटांचा असो… वा १ तासाचा असो… आम्हाला यातून काहीही साध्य करायचं नाही. आम्ही लोकांबरोबर आहोत, हेच आम्हाला सांगायचंय, बाकी आम्हाला काहीच साध्य करायचं नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा दौरा केला. आम्ही साध्य केलं… आम्ही साध्य केलं… असं तुम्ही वारंवार म्हणत आहात. पण तुम्ही कसं साध्य केलं? काय साध्य केलं? हे सगळं लोकांना माहीत आहे. त्यामुळे आम्हाला काहीही साध्य करायची गरज नाही, लोकं आमच्यासोबत आहेत. वाचाळवीर तानाजी सावंतांसारखं घरापासून कार्यालय आणि कार्यालयापासून घर, असे दौरे तरी आम्ही केले नाहीत”, असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे.

Story img Loader