तुमचे प्रेम व ताकदीवर कोकणात पुन्हा शिवसेनेचा झंझावात आणण्यासाठी सर्वानी सज्ज व्हावे. कोकणाच्या मुळावर आलेल्यांना मुळासकट उखडून टाकण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुडाळच्या जाहीर सभेत केले. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीची शेलक्या शब्दांत संभावना करीत नारायण राणे यांचीही खिल्ली उडविली.
कुडाळ येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या मुळावर आलेल्या असुरांनी जमिनी बळकाविल्या आहेत. उपरे, घरातील सर्व असुरांना राजकारणातून उखडून टाकण्यासाठी शिवसेनेचा नव्या दमाने कोकणात झंझावात आणूया, असे आवाहन केले.
शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्गच्या सभेत नतमस्तक झाले होते, त्याची आठवण काढत तेही या सभेसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांना गदा भेट देण्यात आली. त्याचा आधार घेत ठाकरे म्हणाले, ही गदा ढेकणांना मारण्यासाठी उपयोगी पडणार नाही, ढेकणांना पायाने गाडूया, असे आवाहन करत तुमचे प्रेम व ताकद हीच शिवसेनेच्या भगव्याची डौलदार ताकद आहे, असे ते म्हणाले.
कोकणाने ही भगव्याची लाट लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दाखवून कोकण व शिवसेनेचे नाते किती घट्ट आहे हे त्यांना दाखवा, असे आवाहन करून तुमचे प्रेम व ताकदीवरच हे शिवधनुष्य उचलले आहे. शिवाजी महाराज, मच्छिंद्रनाथांनी कोकणात वाढलेल्या असुरांना नष्ट केले, त्यामुळे आता माजलेल्या असुरांना नष्ट करूया, असे आवाहन करीत अंगावर वस्त्र नसणाऱ्यांचे वस्त्रहरण काय करणार, असा टोला त्यांनी हाणला.
आम्ही बोलतोय व तुम्ही भोगताय, अशी अवस्था तुमची करून ठेवली आहे, असे सांगत अन्यायाविरोधात पेटून उठा, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे त्यांनी सांगितले. राणेच्या वस्त्रहरणासाठी ही सभा नव्हे, ती क्षुल्लक बाब आहे. सर्वच गद्दारांना अस्सल शिवसैनिक गाडणार आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगून, नसते उद्योगमंत्री आहेत, त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, पण लोकांना विमानतळ, बंदर अशी विकासाची स्वप्ने दाखवून लुबाडणूक केली जात आहे. गोरगरिबांच्या कल्याणासाठी राजकारण आम्ही करत आहोत. त्यामुळे राजकारण चुलीत गेले तरी चालेल, पण कोकणच्या जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, असे ते म्हणाले.
रेडी बंदर, चिपी विमानतळ जमिनी फुकटात घेऊन आपली तुंबडी भरणाऱ्यांना शिवसेना धडा शिकवेल. हिंमत असेल तर दादागिरी करा. त्यांचे शंभर अपराध भरून झाले आहेत. कोकणातील जनतेची सटकली, तर तुमची दादागिरी संपेल, हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दादांना दिला.
सी वर्ल्ड प्रकल्पासाठी जमीन लाटण्याचा प्रयत्न होत आहे. आम्हाला पर्यटन विकास हवा आहे, पण लाटणारा नको, असा इशारा देत शिवसेना अन्यायाविरोधात लढेल, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे हातभट्टी नव्हे. जगाने नाकारलेले तंत्रज्ञान आणून लोकांची फसवणूक करू नका. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर न्या, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई-गोवा रस्ता, धरण प्रकल्प, आंबा बागायतदार, चिरे, वाळू, खडी अशा जनतेच्या सर्व प्रश्नांवर काँग्रेस-राष्ट्रवादीने फसवणूक केली असून सिंचन प्रकल्पात ७० हजार कोटींचा घोटाळ्यावर पडदा टाकल्याचा आरोप त्यांनी केला.
शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांचा त्यांनी समाचार घेत नारायण राणे यांना मंत्री, खासदार, आमदार घरातच हवे, अशी टीका करत कस्तुरीरंगन समितीला विमानाने फिरवून मायनिंग प्रकल्पाचे समर्थन, तर चिरे, वाळू, खडी प्रकल्पांवर संक्रांत आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
अजित पवार यांना खरोखरच आत्मक्लेश करून घ्यावयाचे वाटत असेल, तर त्यांनी दुष्काळग्रस्त भागात जाऊन अनवाणी किंवा पायात बूट घालून लोकांसोबत चालत दूरवर जाऊन पाणी आणून दाखविण्याची हिंमत दाखवावी, असे आवाहन करत इकडच्या व तिकडच्या दादाची दादागिरी उतरवून टाकण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनी राणे यांचा अप्रत्यक्ष समाचार घेत बॅरिस्टर नाथ पै यांचे भाषण संसदेत पंतप्रधान ऐकत, पण आजचे खासदार बोलतात काय? असा टोला लगावला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला नेभळट व राष्ट्रवादीला लाचार संबोधिले.
शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनी राणे यांच्यावर सडकून टीका केली. या वेळी खासदार संजय राऊत, अनंत गिते, गजानन कीर्तिकर, आमदार विनायक राऊत, अनिल परब, महापौर सुनील प्रभू, अरविंद सावंत, सुरेश प्रभू, राजन साळवी आदी उपस्थित होते.

Story img Loader