शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा घेत विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी मंचावर भाषणाला सुरुवात करण्याआधी घडलेल्या एका प्रसंगाची सध्या जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरे भाषणाला सुरुवात करण्याआधी पोडियमकडे आले आणि अचानक कागदी फटके फुटले. अचानकपणे झालेला आवाजाने उद्धव ठाकरे काही क्षण दचकले आणि फटाके फुटल्याचं लक्षात येताच तात्काळ हजरजबाबीपणे त्यांनी प्रतिक्रिया दिली.
अचानक फटाके फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आधी दचकले आणि मग हसले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना उद्देशून “आपल्याला असाच धमाका करायचा आहे”, असं वक्तव्य केलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.
व्हिडीओ पाहा :
उद्धव ठाकरे म्हणाले, “मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल, तर कोणती शिवसेना खरी आहे हे पाहायला इकडं या. हा ‘चुना लगाव आयोग’ आहे. ते सत्येचे गुलाम आहेत. वरून जे आदेश येतात त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत, हे मी उघडपणे बोलतो आहे.”
“शिवसेनेची स्थापना आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली”
“कारण निवडणूक आयोगाने या तत्वानुसार शिवसेना शिंदे गटाची असल्याचं सांगितलं ते तत्वच खोटं आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे. कदाचित तिकडं वरती निवडणूक आयोगाचे वडील बसले असतील. मात्र, ते आयोगाचे वडील असतील, माझे नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.
“भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या एकजुटतेवर घाव घालत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. त्या हिंदुत्वाला धुमारे फुटत असताना शिवसेना फोडण्यात आली. यांना कोण विचारत होतं, भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं.”
हेही वाचा : VIDEO: “भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, तेव्हा…”, उद्धव ठाकरेंचा खेडमधील सभेत हल्लाबोल
“त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून पाहावा”
“तेव्हा शिवसेनाप्रमुख यांच्यामागे उभे राहिले नसते, तर हे आज दिसले नसते. मात्र, हे निष्ठुर आणि निर्घृणपणे वागत आहेत. ज्यांनी साथ दिली त्यांनाच संपवत आहेत. त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून पाहावा,” असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं.