Uddhav Thackeray :महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या तीन ते चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराच्या तोफा १८ तारखेला थंडावतील. त्याआधी मुलाखती, प्रचारसभा यांचं सत्र सुरु आहे. यावेळची निवडणूक ही अत्यंत वेगळी आणि तेवढीच चुरशीची असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीत सहा प्रमुख पक्षांमध्ये लढत आहे. शिवाय मनसे आणि वंचित बहुजन आघाडी त्याप्रमाणेच तिसरी आघाडीही निवडणुकीच्या रिंगणात आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी एका मुलाखतीत भाजपावर टीका केली आहेच. मात्र शिवबंधन हाती का बांधत नाहीत आणि रुद्राक्ष का घालतात त्यावरही महत्त्वाचं उत्तर दिलं आहे. तसंच राज्याच्या राजकारणाचा विचका भाजपाने केल्याचंही म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे?
महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो विचका झाला त्याला सर्वतोपरी भाजपा जबाबदार आहे. वचन देणं आणि ते पाळणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र भाजपाने मला जे वचन दिलं होतं ते पाळलं नाही. ज्या वेळी कुणी वचनाचा भंग करतं तेव्हा त्यांना धडा शिकवणं ही आपली संस्कृती आहे. २०१९ मध्ये ज्यांनी मला वचन दिलं होतं आणि पाळलं नाही त्यांना धडा शिकवण्यासाठी मी उभा राहिलो. राजकारणाचा विचका हा त्यानंतर केला गेला. राजकारण अत्यंत नीच पातळीवर गेलं. पक्ष फोडून, संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. नाव आणि चिन्ह बेधडकपणे दुसऱ्याला दिलं जातं आहे. दरोडेखोर राजकारणात आले आहेत, यांना महाराष्ट्रातून हद्दपार करायची वेळ आली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) हे भाष्य केलं आहे.
हे पण वाचा- “आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
खरी शिवसेना कुणाची? तर ती माझीच-उद्धव ठाकरे
खरी शिवसेना माझीच आहे, कारण शिवसेना हे नाव दुसऱ्या कुणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. हा निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही. मी जर निवडणूक आयोगाला धोंड्या म्हटलं तर चालेल का? शिवसेना ही आमचीच आहे. मिंधे गट असेल, शिवसेना हे नाव त्यांना कुणीच देऊ शकत नाही. निवडणूक आय़ोगाचं मी ऐकालायच तयार नाही असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी म्हटलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस खरी कुणाची आणि शिवसेना खरी कुणाची हे ठरवण्याची निवडणूक नाही. शिवसेना माझीच आहे असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले. तसंच या मुलाखतीत त्यांनी हातात शिवबंधन नाही आणि रुद्राक्ष आहे यावरही उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे हातात रुद्राक्ष का घालतात?
“बाळासाहेब ठाकरेंची माळ ही मी ठेवली आहे. माझ्या हातातली रुद्राक्ष माझ्या आवडीने घातली आहेत. काहीतरी घराणेशाहीचं घेतलं पाहिजे त्यामुळे मी रुद्राक्ष घेतली आहेत. अनेक लोक सोन्याचे दागिने घालून मिरवतात मी रुद्राक्ष घालतो. शिवबंधन माझ्या हातातच नाही माझ्या मनात आहे. माझं ऑपरेशन झालं तेव्हा मला शिवबंधन काढावं लागलं होतं आणि त्यानंतर बराच काळ उपचारांमध्ये गेला. हात हलत नव्हते हे मी सांगितलं होतं. माझी ट्रिटमेंट सुरु असते तेव्हा रुद्राक्ष मी काढून ठेवतो. पण शिवबंधन तसं नाही ते मला काढता घालता येत नाही. त्यामुळे तूर्तास मी शिवबंधन काढून ठेवलं आहे. मी ते घालू शकत नाही कारण माझ्या हातावर उपचार सुरु आहेत. असं उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.