उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच आपल्याला काम करायचं आहे असं आवाहन आज चंद्रकांत खैरे यांनी संभाजी नगर यांनी केलं आहे. तसंच संभाजी नगर हा बाळासाहेब ठाकरेंचा गड होता आणि आता उद्धव ठाकरेंचा गड आहे हे लक्षात ठेवा. आपण शिवसेना प्रमुखांचे सैनिक आहेत. काही दिवसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

संभाजीनगरच्या सभेत चंद्रकांत खैरे म्हणाले, “जो लोक सोडून गेले ते कुणामुळे मोठे झाले? संदिपान भुमरेंचं ऐकून पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकरली होती. अशा पद्धतीने करत असाल.. तर सांगतो काही दिवसांनी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि आम्ही सत्ताधारी असू. तेव्हा तुम्ही काय कराल?” असा प्रश्न खैरे यांनी विचारला आहे. तसंच उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावाही त्यांनी केला आहे.

इम्तियाज जलील यांच्यावर आरोप

आपल्या भाषणात खैरै म्हणाले, “त्या इम्तियाज जलीलने काही दिवसांपूर्वी आदर्श बँकेचा घोटाळा बाहेर काढला आणि आंदोलनं केली. जो भ्रष्टाचारी माणूस आहे तोच हे सगळं करत होता. दारु, गुटखा यांचे धंदे करतो. आदर्श बँकेत कुणाचा पैसा आहे तर इम्तियाज जलील आणि त्यांच्या माणसांचा आहे.” असाही आरोप खैरेंनी केला. चंद्रकांत खैरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंनीही भाषण केलं. त्यांनी त्यांच्या भाषणात अशोक चव्हाण आणि भाजपावर कडाडून टीका केली.

हे पण वाचा- “अशोक चव्हाण लीडर नव्हे डीलर म्हणणाऱ्या फडणवीसांनी आता त्यांच्याशी डील..”, उद्धव ठाकरेंची टीका

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“अशोक चव्हाण इतक्या लवकर तिकडे जातील असं वाटलं नव्हतं. काल-परवा पर्यंत नीट बोलत होते. त्यामुळे असंच वाटणार, ते तिकडे गेले पण कपाळावर शिक्का काय लागणार? गद्दार! मग आयुष्याची कमाई काय? इतकं सगळं मिळवलंत पण गद्दारीत सगळं गमावलंत. अशोकराव तुम्ही तिकडे गेलात म्हणून तुमच्यावर लगेच आरोप करणार नाही. पण तुम्ही घोडचूक केली आहे जी तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणार आहे. महाराष्ट्र दिल्लीशाहीची जी हुकूमशाही सुरु आहे त्याविरोधात तडफेने उभा आहे. हिंदू आमच्याबरोबर आहेत पण मुस्लिम बांधवही आहेत. हे सगळे का येत आहात? माझा पक्ष चोरला, चिन्ह गद्दारांना दिलं आहे. माझे हात रिकामे आहेत. तरीही इतकी गर्दी होते आहे ही माझी संपत्ती आहे. त्यांच्याकडे भेकडांची सेना आणि गद्दारांची सेना आहे. पण तुमची भाड्याची फौज आमच्या मर्दांशी टक्कर देऊ शकत नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray will become cm of maharashtra said this leader of shivsena ubt scj