भाजपाचा झेंडा हा शेठजी आणि व्यापाऱ्यांचा झेंडा आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी कडाडून टीका केली आहे. या सगळ्यावर आता भाजपा आमदार नितेश राणेंनी उत्तर दिलं आहे. तसंच उद्धव ठाकरे हे त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष १९ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
काय म्हटलं आहे नितेश राणेंनी?
“उद्धव ठाकरेंचा गट अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. याची घोषणा उद्धव ठाकरे १९ जून रोजी करणार आहेत. हे खरं आहे की खोटं? संजय राऊतांनी सांगावं. १९ जूनला उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आहे. उद्धव ठाकरे शिवसेना गट या स्थापनेची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे. कारण त्यादिवशी त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि पक्षचिन्ह मशाल मिळालं आहे. १९ जूनला षण्मुखानंद हॉलमध्ये होणारा उद्धव ठाकरेंचा मेळावा हा अनधिकृत आणि नियमबाह्य आहे. असा मेळावा घेण्याचा अधिकारच उद्धव ठाकरेंना नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकनाथ शिंदे जो मेळावा घेणार तो शिवेसेनेचा वर्धापन दिवस आहे. दुसऱ्यांचा झेंडा, दुसऱ्यांचा पक्ष यावर बोलण्यापेक्षा काय चाललंय ते बघा.” असंही नितेश राणेंनी संजय राऊतांना सुनावलं आहे.
संजय राऊतांनी १०० कोटींची दलाली घेतली
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची आहे. संजय राऊतांना त्यासाठी दलाली मिळाली आहे. महाविकास आघाडी स्थापन होत असताना दलाली करण्यासाठी २०० कोटी घेतले अशी माझी माहिती आहे. उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हा ही समजून घालण्यासाठी १०० कोटींची ऑफर संजय राऊतांना आहे अशी माझी माहिती आहे. पंतप्रधान मोदींवर बोलण्याआधी, भाजपावर बोलण्याआधी, देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याआधी तुझी आणि तुझ्या मालकांची किती लायकी राहिली आहे त्यावरही एक अग्रलेख येऊ दे ” असा खोचक टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे.
आपल्या देशात लोकशाहीनुसार निवडणूक आयोग आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे. १९ जून रोजी उद्धव ठाकरे जो मेळावा घेणार आहेत तो मेळावा अनधिकृत आहे. राजकीय लावारिस असलेल्यांनी दुसऱ्यांचे आई वडील मोजू नयेत असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.