राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ शिवसेनेत परतण्याच्या चर्चेला उधाण आले असले तरी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या काही नेत्यांसाठी मात्र सेनेची दारे बंद झाली आहेत. त्यानंतरही त्यांची इच्छा असेल तर त्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
राज्यात १५० पेक्षा जास्त जागा जिंकून राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि महायुतीचे नेतृत्वसुद्धा पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे करतील, असेही त्यांनी येथे स्पष्ट केले  छगन भुजवळ शिवसेनेत प्रवेश करणार असतील तर त्यात वाईट काही नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करून बाहेर पडलेल्या नेत्यांना शिवसेनेने यापूर्वीच नाकारले असून त्यांच्यासाठी दारे आधीच बंद झाली आहे.
 लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ शिवसेनेच्या उमेदवारांकडून पराभूत झाले असून आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना फटका बसणार आहे. जनतेचा त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही.
..उद्धवना शुभेच्छा -फडणवीस
राज्यात महायुतीचे नेतृत्व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे करतील, या खासदार संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीचे नेतृत्व कोणी करावे, हा निर्णय महायुतीमध्ये घेतला जाईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे, अशी राज्यातील जनतेची इच्छा असेल तर त्यांना शुभेच्छा देतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आधीच महायुतीसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे.

Story img Loader