राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिवसेना फुटल्यापासून उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून ते महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. दरम्यान, आज त्यांनी अमरावतीत जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला आणि भाजपाला थेट आव्हान दिले आहेत.
“आज तुमच्याकडे खोकेच्या खोके पडले आहेत. तुम्ही आमदार विकत घेताय असं मी ऐकतोय. पण त्याच पैशातून माणसं वाचवा ना. माणसं वाचवली तर तुम्हाला कोणाला विकत घेण्याची गरजच लागणार नाही. मतंसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत केली.
हेही वाचा >> “मी पंतप्रधान झालो तर काय फरक पडणार?”, उद्धव ठाकरेंचा प्रश्न; म्हणाले, “आणीबाणीपेक्षाही …”
“पण कामच करायचं नाही. नुसतं हे फोड ते फोड करायचं. मी तर घरी बसलो होतो, तरी सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. तसं संपूर्ण जगामध्ये नंबर एकचे पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान असतानाही तुम्हाला अजूनही इतर पक्ष फोडण्याची गरज का वाटते?” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला.
“शिवसेना पक्ष चोरला, आज राष्ट्रवादी चोरली. उद्या आणखी काही चोरतील. जे काही देशाचं आहे ते विकून टाकायचं. जे राहिलं ते विकून टाकायचं आणि इतर ठिकाणी काही ठेवायचं नाही. दुसऱ्यांचं आहे ते चोरायचं. दोन शब्द यांच्यासाठी आहेत एक आहे तो मस्ती आणि दुसरा आहे आत्मविश्वास. भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे. पण त्यांच्या ताकदीचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नाही. आपण एवढे मोठे झालो, सत्ताधीश झालो, तरीही त्यांना धाकधूक वाटते की आपण निवडून येऊच शकत नाही. सत्तेची मस्ती हीच ती. मग ईडी लाव, सीबीआय लाव, पोलीस लाव असं करायचं. विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जातो आहे. पोलिसांतर्फे नोटीसा दिल्या जात आहेत. जर तुम्ही मर्दांची अवलाद असाल तर या सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या”, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं.
पण मी कोणाची घरं फोडली नाहीत
“माझ्यावर टीका केली जाते की मी इतके दिवस घरी बसून होतो. होय मी घरी बसून होतो पण मी कुणाची घरं फोडली नाहीत. घरफोडे तुम्ही (भाजपा) आहात. मला कितीही काहीही म्हणा की मी घरी बसून काम केलं. मी घरी बसून जे काम केलं ते तुम्हाला घरं फोडूनही करता येत नाही. त्यामुळेच तुम्हाला दारोदारी जातं आहे कारण कुणी दारातच उभं करत नाही. कुठे पोलिसांना बसवलं जातं आहे, कुठे शिक्षकांना कामं सोडून बसवलं जातं आहे.” असं म्हणत शासन तुमच्या दारी या मोहिमेवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.