निवडणुकांपूर्वी खाती आपसात वाटून ते निर्णय जाहीर सांगण्याचे भाजपाच्या नेत्यांनी स्वीकारलेल्या सूत्राचा कित्ता शिवसेना नेत्यांनीही गिरवायला चालू केला आहे. परभणी येथे मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मी गृहमंत्री होईन, असे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटले. गृहमंत्री होताच राज्यातील सर्व घोटाळ्यांची चौकशी करून घोटाळेबाजांना तुरुंगात टाकीन, असेही ते म्हणाले.
तालुक्यातील पोखर्णी येथे पाथरी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि शिवसेना पदाधिकारी यांचा मेळावा तसेच खासदार जाधव यांचा सत्कार रविवारी कदम यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय जाधव, संपर्कप्रमुख रवींद्र मिल्रेकर, जिल्हाप्रमुख डॉ. संजय कच्छवे, गंगाप्रसाद आणेराव, आमदार मीरा रेंगे, युवा सेनेचे केंद्रीय सदस्य डॉ. राहुल पाटील, कल्याणराव रेंगे, बाळासाहेब जाधव, सखुबाई लटपटे, श्रीनिवास रेंगे यांच्यासह मतदारसंघातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख उपस्थित होते.
पुढे कदम म्हणाले, संवेदना नसलेले सरकार उलथून टाकण्यासाठी हेवेदावे विसरून सर्व शिवसनिकांनी एकत्र यावे. पाणी देण्याऐवजी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून महाराष्ट्राच्या सिंचन क्षेत्राचे वाटोळे करण्याचे पाप राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केले आहे, असा आरोप त्यांनी केला. येत्या विधानसभेत शिवशाहीचे सरकार येणार असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मी गृहमंत्री होईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परभणी जिल्ह्याचे आगामी पालकमंत्री म्हणून आमदार रेंगे यांच्यावर जबाबदारी टाकली जाईल आणि हे काम शिवसनिकांना करायचे आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना शिवसनिकांनी नेस्तनाबूत केले आहे. या मतदारसंघातूनही बाहेर पडलेले जर अंगावर येण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना शिवसनिक िशगावर घेतील, असा इशारा नाव न घेता माजी आमदार हरिभाऊ लहाने यांना कदम यांनी दिला. परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. शिवशाहीचे सरकार आल्यास शेतीला २४ तास वीजपुरवठा करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही कदम म्हणाले.
शिवसेनेने गद्दारांची कधीच चिंता केली नाही. महाराष्ट्रातील जनतेने ज्या पक्षाची औकात दाखवली त्याच पक्षात जाण्याची दुर्बद्धी इथल्या माजी आमदाराला सुचली, अशी टीका मिल्रेकर यांनी यावेळी केली. लायकी नसतानाही शिवसेनेने गणेश दुधगावकरांना खासदार केले. नृसिंह मंदिरात गद्दारी न करण्याची शपथ घेणारे दुधगावकरांनी चार वर्षांत शपथ मोडली. परंतु विद्यमान खासदार संजय जाधव हे निष्ठावान शिवसनिक आहेत आणि ते कधीही पक्षाशी गद्दारी करणार नाहीत, अशी ग्वाही मिल्रेकर यांनी दिली.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घेण्याची मागणी यावेळी खासदार जाधव यांनी केली. गंगाखेड व जिंतूर मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शिवसेनेची वाताहत झालेली आहे. परंतु आता यापुढे या दोन्ही मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून आपला विकासनिधी कंत्राटदार आणि या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या हातात न देता सामान्य शिवसनिकांकडे देण्यात येईल. येत्या निवडणुकीत एकमेकांचे उणेदुणे काढू नका. हेवेदावे विसरून सत्तापरिवर्तनासाठी एकत्र या, असे आवाहन खासदार जाधव यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात आमदार रेंगे यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा सांगितला. शिवसेनेशी गद्दारी करून मनसेत गेलेल्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले.