महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाची भूमिका निभावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे नेतृत्व दिलं पाहिजे. तरच, बाळासाहेबांचे विचार, स्वाभिमान, हिंदुत्व आणि मराठीपण टिकून राहिल, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर प्रकाश महाजन म्हणाले, “चर्चा फक्त प्रसारमाध्यमांमध्ये आहे. प्रत्यक्ष भेटलेत का? राज ठाकरे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. पण, राज्यातील राजकीय परिस्थिती पक्ष पाहता, सक्षम विरोधी पक्ष किंवा नेता म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जातं.”

हेही वाचा : निधी वाटपात भाजप नेते शिवसेनेला डावलत आहेत- अर्जुन खोतकरांचे

“पूर्वीसारखा भाजपा राहिला नाही”

“गेली एक-दीड वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात जे चालू आहे, ते इतिहासात कधीही घडलं नव्हतं. जो महाराष्ट्र देशाला दिशा देता होता, तो स्वत: दिशाहीन झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेत राष्ट्रवादीचा ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार समोर आणू, असं बोलतात. नंतर आठ दिवसांत भाजपाने या नेत्यांना सरकारमध्येच मानाचे पान दिलं. पूर्वीसारखा भाजपा राहिला नाही. महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना ही खात्री नव्हती की, २०२४ ला घवघवीत यश मिळवून मोदींच्या पाठीमागे खासदार उभे करू,” असा टोला प्रकाश महाजन यांनी लगावला.

“असंतोषाचा जनक होण्याची क्षमता राज ठाकरेंमध्ये”

“स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस ज्या राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराबद्दल भांडले. त्याच लोकांबरोबर हे सत्तेत बसले आहेत. महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ आहे. या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता राज ठाकरेंमध्ये आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, तर सर्वसामान्य म्हणून कोणालाही आनंद होण्यासारखी गोष्ट आहे. पण, राज ठाकरेंशिवाय दुसरा नेता, या गोष्टीला तोंड देईल असं वाटत नाही,” असा दावाही प्रकाश महाजन यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackray and raj thackeray get together say mns leader prakash mahajan ssa
Show comments