राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी-मराठा असा वाद सुरू आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मराठा समाजाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे, तर मराठांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता, स्वतंत्र आरक्षण द्या, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मांडली आहे. दरम्यान, राज्यातील ओबीसी-मराठा वादावरून आता उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावरून भाजपा शिंदे गटावर सडकून टीकाही केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथील मेळाव्यात बोलत होते.
हेही वाचा- उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल, “गद्दार झालो तरीही चालेल पण खुर्ची…”
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
माझं मराठा समाजाला, जरांगे पाटलांना, ओबीसी नेत्यांना आणि धनगर बांधवांना आवाहन आहे, की आपण कृपया भांडू नका, सर्वांनी एकत्र या. विश्वचषकाचा आनंद साजरा करण्यासाठी लाखो लोक एकत्र येऊ शकतात, मग आपल्या स्वत:च्या न्याय हक्कासाठी आपण एकत्र का येऊ शकत नाही? आपण सगळे एकत्र आलो, तर भाजपाला गुढघ्यावर आणू शकतो. ज्याप्रमाणे भाजपाने आपल्यातील एका गद्दाराला हाताशी घेऊन शिवसेना फोडली, त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, माझी सर्व समाजातील नेत्यांना विनंती आहे, की त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन आरक्षणाबाबतची भूमिका मांडावी, जर आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याची गरज असेल, तर त्यांना विधानसभेत तसा ठराव पारीत करून तो लोकसभेत पाठवायला सांगावे, आम्ही त्याला बिनशर्त पाठिंबा देऊ, असेही त्यांनी जाहीर केलं.
शिंदे गटावर केली टीका
उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिंदे गटावर जोरदार टीकाही केली. या गद्दांरांनी चोरुन विजय मिळवला आहे. शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरलं आहे. त्यांचा हा विजय हा खरा विजय नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चोरून अजित पवारांना दिला. शिवसेनाप्रमुखांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकलं. आपल्याला वाटलं की चला यांचा चांगला विचार आहे. पण त्यांच्या फोटोचा वापर करण्यासाठी यांनी हे कपट केलं. ग्रामीण भागात, शहरी भागात बाळासाहेबांचा फोटो लावायचा आणि धनुष्याबाण बाळासाहेबांचा आहे हे सांगून चोरुन मतं मागायची, असा प्रकार सुरू आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – “तुम्हाला नातेवाईक आणि सगेसोयरे यांच्यातील फरक कळतो का?” मनोज जरांगेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर!
अनेकांनी मला सांगितलं की आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हाला मतं दिली आहे. कारण मशाल लोकांपर्यंत उशिरा पोहचली. आता मशालीच्या माध्यमांतून यांची पापं आपल्याला जाळायची आहेत. गद्दार झालो तरीही चालेल पण मी खुर्ची सोडणार नाही यांचं धोरण मी उलट म्हणतो खुची गेली तरीही चालेल पण मी गद्दारी करणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.