गोपीनाथ मुंडे हे माझ्यासाठी मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शकही होते. ज्या ज्यावेळी आम्ही भेटायचो त्या-त्यावेळी ते जुन्या आठवणी सांगायचे. माझ्या वडिलानंतर वडिलकीच्या नात्याने ज्यांनी मला जवळ केले ते गोपीनाथ मुंडे यांनीच, अशी आठवण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी परळी येथे सांगितली. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी उदयनराजे अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले. त्यांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
परळी येथे गोपीनाथ मुंडेंच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती संभाजी महाराज आदींसह अनेक मोठ्या नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. गोपीनाथ मुंडेंबाबत बोलताना उदयनराजेंना गहिवरून आले होते.
उदयनराजे यांनी गोपीनाथ मुंडेंचे काही किस्से सांगितले. ते म्हणाले, मी जेव्हा नाशिकमध्ये होतो. तेव्हा मला अचानक गोपीनाथ मुंडेंचा फोन आला. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मुंबईत येण्यास सांगितले. महत्वाचं असेल तर मी आत्ताच येतो, असे त्यांना सांगितले. पण मुंडेंनी मला आज नको उद्याच या .. तुमचा शपथविधी असल्याचे म्हटले. मला तो धक्काच होता. कोणत्याही परिस्थिती मुंबईत येण्यास सांगितले. त्यांनी मला हा धक्काच दिला होता. त्यांनी मला अखेरपर्यंत खूप प्रेम दिले.
मुंडे साहेबांची आठवण येत नाही, असा एक दिवसही जात नाही. अपघात होण्यापूर्वी दोन तारखेला मी दिल्लीला पोहोचलो. मला झोप येत नव्हती. सकाळी कोणत्याही परिस्थितीत त्यांची भेट घ्यायची ठरली. सकाळी बंगल्यावर फोन लावला, तेव्हा त्यांच्या ऑपरेटरने मुंडे हे विमानतळाकडे चालल्याचे म्हटले. त्यांना लगेच मोबाइल लावला. बीडवरून परतल्यानंतर भेटायचे ठरले. पण त्यानंतर ५ ते ७ मिनिटांत हा प्रकार झाला.
त्यांनी कधी जात-पात मानली नाही. सर्वसाधारण माणसाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. कष्टकऱ्यांचे कसे भले होईल हे त्यांनी पाहिले. गोपीनाथ मुंडेंचे हेच गुण पंकजा व प्रीतम मुंडे यांच्यात असल्याचेही ते म्हणाले.