खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातील देगाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत तब्बल २०० हून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी शर्यतीच्या ठिकाणी बैल गाडीतूनच उदयनराजेंनी हटके एन्ट्री घेतली. डोक्यावर लाल फेटा, हातात कासरा घेऊन प्रवेश केला. त्यामुळे उदयनराजेंच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी त्यांच्या समर्थकांना त्यांची वेगळी झलक पाहायला मिळाली.
“मी पण शेतकरी आहे. माझ्या निवडणुकीच्या शपथपत्रात बघा. शेतकरी बैलांना खूप खूप जपतात. जिवापाड प्रेम करतात”, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. “बैलगाडा शर्यतीचा अनुभव आणि आनंद घ्यायचा असेल तर त्यात निखळ मनाने सहभागी व्हायला पाहिजे मग बघा काय उत्साह आणि मज्जा येते ते”, असेही उदयनराजे म्हणाले.
खासदार उदयनराजे भोसले यांचा २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने साताऱ्यात बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या खास अंदाजात कॉलर उडवत या शर्यतीत भाग घेतला. त्यांनी स्वतः बैलगाडाही चालवला. ढोल ताशांच्या गजरात, कार्यकर्त्यांच्या घोषणांमध्ये उदयनराजेंचं धमाकेदार स्वागत कऱण्यात आलं.