पुणे : सलग तीन वर्षे आधारकार्डचा वापर न केल्यास ते निष्क्रिय करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) घेतला आहे. त्यामुळे पॅनकार्ड आणि बँक खात्याला आधार जोडणी करणे बंधनकारक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आधार आणि पॅनकार्ड यांच्यावरील नाव, जन्मदिनांक, जन्मवर्ष आणि छायाचित्र या माहितीमध्ये तफावत आढळल्यास त्यांची जोडणी करता येणार नसल्याचेही प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी जोडणी करण्यासाठी दिलेली मुदत नुकतीच ३१ मार्च २०१९ पर्यंत पुन्हा वाढविली आहे. आतापर्यंत आधार आणि पॅन क्रमांक जोडणीसाठी तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. हीच मुदत आता ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे. बँक खाते, मोबाईल सीमकार्ड, एलपीजी गॅस सिलींडर अनुदान आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे.
दरम्यान, आधार कार्डवरील नाव, लिंग, जन्मतारीख, जन्मवर्ष आदींमध्ये चुका असल्यास आधारचा वापर करताना समस्या येऊ शकतात. आधारकार्ड काढल्यानंतर सलग तीन वर्षे त्याचा कोणत्याही कारणासाठी वापर केला गेला नाही तर ते निष्क्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत युआयडीएआयचे विभागीय संचालक सुन्मेष जोशी यांच्याशी संपर्क करण्यात आला. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
* केंद्र आणि राज्य शासनाच्या शासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी, प्राप्तिकर विवरण, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बँक खाते, मोबाईल सीमकार्ड अशा विविध गोष्टींसाठी आधार बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळेच सलग तीन वर्षे आधारचा वापर न केल्यास ते निष्क्रिय करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे प्राधिकरणाकडून पाठविण्यात आलेल्या ईमेलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
* आधार कार्डमधील तपशीलात बदल करण्यासाठी नागरिकांना संबंधित केंद्रांवर सतत हेलपाटे घालावे लागतात. त्यांना दिलासा देण्यासाठी आता संगणकाद्वारे, कुणालाही हे बदल नोंदवता येतील. मात्र, ज्या नागरिकांचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडला आहे, त्यांनाच आधारशी संबंधित कोणत्याही माहितीमधील बदल प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जाऊन करता येईल.