सोलापूर : सोलापूर शहरासाठी पिण्याकरिता येत्या दोन दिवसांत उजनी धरणातून भीमा नदीवाटे सहा टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी दहा दिवसांत टाकळीजवळील औज बंधा-यात पोहोचेपर्यंत नदीकाठच्या गावांमध्ये दररोज केवळ तीन तास वीजपुरवठा होईल. विद्युत मोटारी लावून पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणा-या शेतक-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.
मुळातच उजनी धरणात यंदाच्या वर्षी पाणीसाठा कमी असताना त्यात नियोजनशून्य पाणीवाटप होत अवघ्या चार महिन्यात ४० टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा फस्त झाला आहे. सध्या धरणात उणे १८ टक्क्यापर्यंत पाणीसाठा खालावला असतानाच सोलापूर शहराकरिता धरणातून सहा टीएमसी पाणी सोडावे लागत आहे. हे पाणी सोडल्यानंतर धरणातील पाणीसाठा आणखी खालावण्याची शक्यता असून त्यातून धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरासह लाभक्षेत्र भागातील शेतक-यांमध्ये रोष वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून दहा टीएमसी पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा…केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, “२०२४ तर जिंकूच! पुढील लक्ष्य २५ वर्षांच्या विजयाचे…”
दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील संभाव्य पाणी व चारा टंचाई प्रश्नासंदर्भात केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मागील पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे उजनी धरणात गेल्या १५ ऑक्टोंबरपर्यंत ६०.६६ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतर हिवाळ्यातच धरणातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागला. धरणातील पाणीवाटपाचे नियोजन चुकीचे झाल्यामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर खालावत गेल्याचा आरोप जाणकार मंडळींनी केला आहे.
उजनी धरणातील पाणीसाठा खालावत असून येत्या एप्रिलनंतर निर्माण होणारा पाणीप्रश्न टाळण्यासाठी इंदापूर, कर्जत भागातून उजनीच्या बँकवॉटरमधून होणारा बेकायदा पाणी उपसा रोखण्यात येणार आहे. त्यासाठी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू असताना पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या उजनी धरणाशी संबंधित काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्याची गरज आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाणीटंचाईची माहिती देणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
हेही वाचा…“महाराष्ट्रातली महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा..” , अमित शाह यांचा हल्लाबोल
जिल्ह्यात सध्या सात मध्यम प्रकल्पही कोरडे पडले असून त्यात जेमतेम ९.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर ९० कोल्हापुरी बंधा-यांमध्येही ९ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. जिल्ह्यात मुक्या जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन केले जात असून मे अखेर चारा शिल्लक आहे. चार उत्पादनासाठी शेतकऱ्यांना साडेतीन कोटी रूपयांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. मूरघाससाठी दोन कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात विक्रीसाठी जाऊ न देण्यासाठी जिल्हा व राज्य सीमांवर ५८ तपासणी नाक्यांवर यंत्रणा कार्यरत राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा…स्मृती इराणींचे राहुल गांधींना आव्हान, “आमचा एक साधा कार्यकर्ताही…”
जिल्ह्यात ७४ कोटी ३५ लाख रूपये खर्चाचा टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या टंचाईग्रस्त सहा गावांना सहा टँकरने पाणीपुरवठा होत आहे. माळशिरस तालुक्यातील भांब व पिंपरी, माढा तालुक्यातील तुळशी, करमाळा तालुक्यातील घोटी आणि साडे तर मंगळवेढा तालुक्यातील येड्राव या सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. टँकरची मागणी येत असून त्याचे नियोजन केले जात असल्याचे कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.