सोलापूर : सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील महाकाय उजनी धरणात अवघ्या पाच दिवसांत २६ टीएमसी म्हणजे ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा वधारला आहे. गतवर्षी याच दिवशी हेच धरण वजा ८ टक्के भरले होते.
असे आहे उजनीचे पाणी साठवणीचे गणित
राज्यात मोजक्या प्रमुख मोठ्या धरणांपैकी उजनी धरण मानले जाते. या धरणाची एकूण पाणी साठवण ११७ टीएमसी असून, त्यातील ६३.६६ टीएमसी पाणीसाठा मृत मानला जातो. याचा अर्थ असा, की ११७ टीएमसीपैकी ५३ टीएमसी पाणी वापरले गेले, की उरलेल्या पाणीसाठ्याचा वापर काटकसरीने करावयाचा असतो. धरण मृत पाणीसाठ्यात जाणे, हा सावधानतेचा इशारा मानला जातो. या मृत साठ्यातील पाणी शेती सिंचन व उद्योग प्रकल्पांसाठी न वापरता केवळ पिण्यासाठी राखून ठेवावे लागते. मृत साठ्यात गाळ व इतर दूषित घटकही असतात.
क्षमता १२३ टीएमसीपर्यंत नेणे शक्य
हे धरण एकूण ११७ टीएमसी साठवण क्षमतेचे असले, तरी प्रत्यक्षात आणखी पाच टीएमसी म्हणजे १२३ टीएमसी क्षमतेपर्यंत पाणी साठवता येते. सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला आदी प्रमुख छोट्या-मोठ्या शहरांसह अनेक गावांना पिण्यासाठी याच धरणातील पाणी वापरले जाते.
… तरी सोलापूर तहानलेले
धरण पूर्ण क्षमतेने भरूनसुद्वा पाणीवाटप करताना नियम धाब्यावर बसविले जातात. विशेषतः बड्या राजकीय नेत्यांसह साखर सम्राटांच्या दबावामुळे पाणीवाटप नियोजनाचा बोजवारा उडतो. परिणामी, एवढ्या मोठ्या धरणातील पाणीसाठा लवकर खालावतो. मृत साठाही ६० टक्क्यांपर्यंत खालावतो. त्यामुळे, सोलापूरसह इतर शहरे व गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होतात. सोलापूरसाठी धरणातून तिहेरी पाणी उपसा करावा लागतो. यंदा हीच स्थिती निर्माण झाली होती.
हेही वाचा…दापोली किरांबा येथील डोंगराला तडा गेल्याने ग्रामस्थांना स्थलांतर करण्याचे आदेश
यंदाचा येवा जोरदार
या पार्श्वभूमीवर, मृग नक्षत्राच्या पावसाने साथ दिल्याने धरण हळूहळू भरत गेले. सह्याद्री घाट माथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसावर उजनी धरणाची पाणी साठवण अवलंबून आहे. यंदा अनुकूल परिस्थितीमुळे धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढला. मंगळवारी सायंकाळी सहापर्यंत धरणात एकूण ८९.४० टीएमसी, तर २५.७४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा (४८.०५ टक्के) जमा झाला होता. पुण्यातील बंडगार्डनमधून २६ हजार ४१५ क्युसेक वेगाने दौंडच्या दिशेने पाणी सोडले जात असल्याने दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ३३ हजार १६७ क्युसेक होता. त्यामुळे रात्री नऊपर्यंत धरण निम्मे भरले.