एजाजहुसेन मुजावर, सोलापूर
एकीकडे ‘ऊस वाढवा अन् पाणी आटवा’ हे समीकरण कायम असतानाच सुमारे दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहरासाठी उजनीतील तब्बल २० टीएमसी पाणी नदीवाटे राखून ठेवण्याची परंपरा यापुढेही चालून ती कधी बंद पडणार, हे कोणालाही सांगता येईनासे झाले आहे. सध्या हिवाळ्यात दुष्काळाचे चटके बसत असताना आगामी उन्हाळ्यात दुष्काळाचे चित्र किती भीषण असणार, याची कल्पना केली तर धरणातील पाण्याचे मोल जाणून पाण्याचे शिस्तीने व काटेकोरपणे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोलापूर जिल्ह्य़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची एकूण १२३ टीएमसी एवढी पाणीसाठवण क्षमता आहे. यंदाच्या वर्षी धरणात १२० टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा झाला होता. गेल्या दोन महिन्यांत धरणातील पाणी उपसले जाऊन सध्या ९९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यात चल स्वरूपात ३६.२७ टीएमसी पाणीसाठा (६७.७० टक्के) शिल्लक राहिला आहे. उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनीही पावसाळ्यात पुणे जिल्ह्य़ातून उजनी धरणात पाण्यामुळे एकूणच पाणीसाठा वाढला असताना यापैकी बरेच वाढीव पाणी नदीवाटे न सोडता त्याच सुमारास खरीप हंगामासाठी व आसपासचे तलाव व कालव्यांच्या पुनर्भरणासाठी सोडले होते. त्यामुळे ११.५० टीएमसी पाणी सत्कारणी लागले हे सुदैव. जेव्हा पुणे जिल्ह्य़ातून पाण्याचा प्रवाह घटत गेला, तेव्हा लगेचच धरणातून पाणी सोडणे बंद झाले. त्यामुळे पाण्याची नासाडी टळली. त्याचे श्रेय अर्थात प्रशासनाला आहे.
तथापि, उजनी धरणातील पाण्याच्या आतापर्यंतच्या नियोजनाचा विचार केला तर पाण्याचा वापर काटकसरपणे वापर करण्याची मानसिकताच अजून तयार झाली नाही, असे दिसून येते. जिल्ह्य़ात सद्य:स्थितीत ३० पेक्षा जास्त लहान-मोठे साखर कारखाने सुरू असून त्यासाठी एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात लागवड झालेल्या उसाचा पुरवठा होतो. दुष्काळी परिस्थितीसह नेहमीच ऊस जगविण्यासाठी प्रामुख्याने उजनी धरणाच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. उसासाठी लागणाऱ्या भरमसाट पाण्याचा विचार करता त्यावर ठिबकसिंचन पद्धती सक्तीचे करणे आवश्यक असले तरी त्याकडे नेहमीच डोळेझाक केली जाते. त्यामुळेच उसाच्या शेतीसाठी ठिबकसिंचन पद्धतीचा वापर होण्याचे प्रमाण जेमतेम १८ ते २० टक्के एवढेच दिसून येते. यासंदर्भात सातत्याने आग्रही चर्चा होऊनदेखील त्याचा ऊसक्षेत्राशी संबंधित मंडळी गांभीर्याने विचारच करायला तयार नाहीत. ऊसशेतीसाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडूनही ठिबकसिंचनाचे बंधन घालणे जरुरीचे होते. ठिबक सिंचनपद्धतीचा अवलंब केल्याशिवाय ऊसशेती कर्ज मिळणार नाही, असा दंडक घातला गेला तर उसाच्या शेतीवरील पाण्याच्या भरमसाट वापराला वेसण बसू शकेल. परंतु ऊसशेती व साखर उद्योगाशी हितसंबंध जोपासणारे हातच शासन दरबारी असतील तर ठिबक सिंचन असो वा अन्य कोणती बंधने येण्याची शक्यताच उरत नाही, असे दिसते. धरणाच्या पाण्याचे शिस्तीने व काटेकोरपणे नियोजन करण्यात अभाव आतापासूनच दिसत आहे. नियोजनाचा हा ‘दुष्काळ’ म्हटला पाहिजे.
उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्य़ाचा कायापालट झाला आहे. या धरणामुळे जिल्ह्य़ातील साखर उद्योगासह एकूण सुमारे चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल होते. कालच्या फाटक्या शेतकऱ्याच्या अंगणात विकासाची गंगा अवतरली आणि शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळू लागला आहे. प्रगतीचे लक्षण असलेले हे सारे काही ठीकच आहे. परंतु त्याचवेळी पाण्याचाही नीटनेटका विचार झाला पाहिजे. पाण्याची प्रचंड नासाडी करीत आपण उसाच्या माध्यमातून विकासाचे मळे फुलविणार असू तर भविष्यकाळ कदापि माप करणार नाही, याची जाणीव किमान नव्या पिढीत तरी निर्माण होणे अपेक्षित आहे.
अडीचशे किलोमीटरवरून पाणी
एकीकडे उसासाठी उजनी धरणातील सुमारे ६०-७० टक्के पाणी फस्त होत असतानाच दुसरीकडे देशात कोठेही नाही, अशी पिण्यासाठी पाणीपुरवठा एकमेव सोलापुरात दिसून येते. सुमारे दहा लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहरासाठी तब्बल २५० किलोमीटर दूरच्या अंतरावरून उजनी धरणातून भीमा नदीवाटे पिण्यासाठी पाणी सोडले जाते. सोलापूरकरांची तहान भागविण्यासाठी उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा हिशेब पाहिला तर दर वर्षी तब्बल २० ते २२ टीएमसी एवढे पाणी भीमा नदीवाटे सोडण्याची अजब पद्धत आजही कायम आहे. प्रत्यक्षात सोलापूरकरांना पिण्यासाठी दर वर्षी दोन ते अडीच टीएमसी पाणी पुरेसे आहे. एवढे पाणी दिल्यास सोलापूरकरांना ते नियमितपणे व पुरेशा प्रमाणात मिळणे सहज शक्य आहे. दोन ते अडीच टीएमसी पाणी बंद नलिकेद्वारे दिले गेल्यास हे सहज शक्य आहे. उजनी धरण ते सोलापूर थेट जलवाहिनी योजना अस्तित्वात आहे. परंतु ती अपुरी आहे. त्यासाठी उजनी धरण ते सोलापूर समांतर जलवाहिनी योजना मार्गी लागणे गरजेचे आहे. खूप विलंबाने का होईना, अखेर ही समांतर जलवाहिनी योजना मंजूर झाली आहे. ४५० कोटी खर्चाची ही योजना सांगितली जाते. प्रत्यक्षात ती सातशे कोटी रुपये खर्चाच्या घरात जाऊ शकेल. सोलापूरकरांना पिण्यासाठी म्हणून उजनी धरणातून दर तीन महिन्यास एकदा भीमा नदीवाटे सोडले जाणारे पाच टीएमसी पाणी २५० किलोमीटर अंतर कापून जेव्हा दहा-पंधरा दिवसांनी शेवटी टाकळी बंधाऱ्यात पोहोचते तेव्हा टाकळी बंधारा अर्धाच टीएमसी भरू शकतो. म्हणजे सोडलेले पाण्यापैकी तब्बल साडेचार टीएमसी पाणी वायाच जाते. वर्षांतून असे चार वेळा मिळून १८ टीएमसी पाणी अक्षरश: वायाच जाते. आश्चर्याची बाब अशी की, सोलापूरकरांची तहान भागविण्याच्या गोंडस नावाखाली उजनी धरणातून भरमसाट प्रमाणात सोडण्यात येणारे पाणी जेव्हा भीमा नदीतून २५० किलोमीटर अंतर कापत येते, त्यात शेजारच्या कर्नाटक सीमेवरील ९० किलोमीटरचे अंतर समाविष्ट आहे. म्हणजे हे पाण्यावर कर्नाटकातील शेतकरीही सहजपणे डल्ला मारतात. त्यावर प्रशासन काहीही करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.