हॉलिवूडमधून बॉलिवूडमध्ये जे वादळ आले आहे, ते धोकादायक असून एवढं काबाडकष्ट करून मिळवलेले यश एका अशाप्रकारच्या वावटाळीने उडून जाते असं मत ख्यातनाम सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं. पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना निकम यांनी #MeToo चं नाव न घेता याबाबत अप्रत्यक्षपणे आपलं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला सिनेअभिनेते सयाजी शिंदे हे देखील उपस्थित होते.

पुणे नवरात्रो महोत्सवा प्रसंगी महर्षी पुरस्काराने पद्मश्री सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि विशेष गौरव पुरस्काराने सयाजी शिंदे यांना रितू छब्रिया यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बोलताना निकम म्हणाले की, हॉलिवूडमधून बॉलिवूडमध्ये जे वादळ आले आहे, ते धोकादायक असून एवढं काबाडकष्ट करून मिळवलेले यश एका अशाप्रकारच्या वावटाळीने उडून जातं. तुम्ही त्याच्यामध्ये नसाल असा विश्वास निकम यांनी तेथे उपस्थित असलेल्या सयाजी शिंदे यांच्याकडे पाहून व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले , मी कायम सर्व सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून काम केले असून या पुढील काळात देखील अशाप्रकारेच काम करीत राहणार आहे. तसेच सध्या सिरीयलमुळे नैसर्गिक उपजतबुद्धी नष्ट होत आहे. त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होताना दिसतोय. ते पुढे म्हणाले की, गुन्हेगारांना कायद्याच्या बडग्या बरोबरच त्याच्या गुन्ह्याची जाणीव करून देणेही आवश्यक आहे. चुका रेटून नेण्यापेक्षा चुकांची दुरुस्ती करण्यातच शहाणपण आहे. सध्याच्या तरुणपिढीने सकारात्मक विचार करावा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

कोणाच्या मनाविरोधात कोणतेही कृत्य करू नये : सयाजी शिंदे
MeToo ला कुठून सुरुवात झाली यावर बोलण्यापेक्षा कधीच कोणाच्या मनाविरोधात कोणतेही कृत्य करू नये.जेणेकरून त्या व्यक्तीला,प्राण्याला त्रास होईल असे करू नये. केवळ आणि केवळ आंनद देण्याचे काम करावे अशी भूमिका शिंदे यांनी यावेळी मांडली.  सयाजी शिंदे पुढे म्हणाले की, आपण सर्व 33 कोटी देव आहे असे मानतो. त्याप्रमाणे झाडपण एक देव आहे असे सर्वांनी मानावे. तसेच आई आणि झाडाशिवाय जगात काही मोठे नाही. तुम्हाला सर्व फसवतील पण झाड फसवणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा असे आवाहन त्यांनी केले.